वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टोरंटोत भारतीय भूकंप,’ असे म्हणत रशियाचा महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव याने ‘कँडिडेट्स’ स्पर्धेचे जेतेपद पटकावताना ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारताच्या डी. गुकेशचे कौतुक केले. १७ वर्षीय गुकेशने जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी सर्वांत युवा आव्हानवीर ठरण्याचा मान मिळवला आणि विशेष म्हणजे त्याने कास्पारोवचाच ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.

टोरंटो येथे झालेल्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत जेतेपदासाठी अखेरच्या फेरीपर्यंत चुरस पाहायला मिळाली. रविवारी झालेल्या १४व्या फेरीत गुकेशने अमेरिकेचा अनुभवी ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराला बरोबरीत रोखले. त्याच वेळी गेल्या दोन ‘कँडिडेट्स’मधील विजेता इयान नेपोम्नियाशी आणि अग्रमानांकित फॅबियानो कारुआना यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. त्यामुळे अखेरीस गुकेशने अर्ध्या गुणाने नाकामुरा, नेपोम्नियाशी आणि कारुआना यांच्यावर सरशी साधली. ‘कँडिडेट्स’ जिंकणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसराच भारतीय बुद्धिबळपटू ठरला.

हेही वाचा >>>IPL 2024 : ऋतुराज गायकवाडने झळकावले ऐतिहासिक शतक, CSK साठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

कास्पारोव १९८४मध्ये वयाच्या २२व्या वर्षी ‘कँडिडेट्स’चा विजेता ठरला होता. पुढे जाऊन त्याने रशियाच्याच अॅनातोली कारपोवाला पराभूत करून सर्वांत युवा जगज्जेता बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवला होता. त्याने ‘एक्स’च्या माध्यमातून गुकेशचे कौतुक केले.

‘‘अभिनंदन! टोरंटोत झालेला भारतीय भूकंप हा बुद्धिबळविश्वातील बदलाचे प्रतीक होता. १७ वर्षीय डी. गुकेश आता विद्यामान जगज्जेत्या डिंग लिरेनविरुद्ध बुद्धिबळातील सर्वांत मोठ्या किताबासाठी आव्हान देईल,’’ असे कास्पारोवने आपल्या पोस्टमध्ये लिहिले. पूर्वी ज्याप्रमाणे रशियाचे बुद्धिबळात वर्चस्व होते, त्याच दिशेने आता भारताची वाटचाल सुरू झाली आहे, असे कास्पारोवला सुचवायचे होते.

तसेच गुकेशच्या या यशाचे श्रेय कास्पारोवने आनंदलाही दिले. पाच वेळच्या विश्वविजेत्या आनंदमुळे बुद्धिबळ हा खेळ भारतात वेगळ्या उंचीवर पोहोचला. अलीकडच्या काळात आनंदने खेळणे कमी केले असले, तरी आपल्या अनुभवाचा उपयोग नवोदित बुद्धिबळपटूंना व्हावा यासाठी तो कायम प्रयत्नशील असतो. वेस्टब्रिज-आनंद बुद्धिबळ अकादमीच्या माध्यमातून भारतातील उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना मोलाचे मार्गदर्शन केले जात आहे आणि गुकेशही याच अकादमीचा भाग आहे.

गुकेशने मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर ‘ग्रँड चेस टूर’ने गुकेशचे अभिनंदन केले. त्यांच्या पोस्टखाली ‘विशी आनंदची ‘मुले’ आता जगावर राज्य करायला निघाली आहेत,’ असे कास्पारोवने लिहिले.

जगज्जेतेपदाची लढत नोव्हेंबरडिसेंबरमध्ये

विद्यामान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि ‘कँडिडेट्स’ जिंकून सर्वांत युवा आव्हानवीर ठरलेला भारताचा गुकेश यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत या वर्षी २० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. ‘फिडे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी इमिल सुटोव्स्की यांनी समाजमाध्यमावर एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच या लढतीचे ठिकाणही अद्याप निश्चित झालेले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates chess winner d gukesh praised by garry kasparov sport news amy
Show comments