वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचा इशारा; रविवापर्यंत मुदत
जर एकाही खेळाडूने आर्थिक शर्तीचे पालन करून नवीन करारावर स्वाक्षरी करणे अनिवार्य असेल. जर त्यांनी करारावर स्वाक्षरी केली नाही, तर त्यांना विश्वचषकात सहभागी होता येणार नाही, असा इशारा वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने खेळाडूंना दिला आहे. आर्थिक शर्तीचे पालन करण्यासाठी मंडळाने खेळाडूंना रविवापर्यंत मुदत दिली आहे.
जमैकाच्या एका आकाशवाणी वाहिनीवर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल म्युरहेड यांनी सांगितले की, ‘‘वेस्ट इंडिजने विश्वचषकात सहभागी व्हावे, या मताचा मी आहे; पण या विश्वचषकात खेळण्यासाठी खेळाडूंनी आर्थिक शर्तीचे पालन करून मंडळाशी नवीन करार करायला हवा. जे खेळाडू करार करतील त्यांनाच विश्वचषकात देशाकडून खेळता येईल; पण जर त्यांनी करार स्वीकारला नाही, तर त्यांना खेळता येणार नाही.’’
नवीन आर्थिक शर्तीप्रमाणे आमच्या मानधनात कपात होणार असल्याने नवीन करार आम्हाला मान्य नसल्याचे मत वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. ‘‘आम्हाला विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेत नक्कीच खेळायचे आहे, पण आम्हाला मंडळाच्या आर्थिक शर्ती मान्य नाहीत,’’ असे सॅमीने म्हटले होते.
यावर प्रकाशझोत टाकत सॅमीने म्हटले होते की, ‘‘विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) काही रक्कम मिळते. माझ्या मते मंडळाला ८० लाख डॉलर्स आयसीसीकडून मिळतात. त्यानुसार मंडळ संघाला त्यामधील २५ टक्के समभाग देत असते. म्हणजेच खेळाडूंना २० लाख डॉलर्स मिळतात. पंधरा सदस्यीय संघाचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूला एक लाख ३३ हजार डॉलर्स मिळतात, पण नवीन करारानुसार संघाला ४ लाख १४ हजार डॉलर्स एवढेच मानधन देण्यात येणार आहे. हे एकूण रकमेच्या फक्त पाच टक्के एवढेच आहे. यामध्ये आमचे ८० टक्के नुकसान आहे. आम्ही विश्वचषकात सहभागी होण्यासाठी सज्ज आहोत, पण आम्हाला पूर्वी एवढेच मानधन मिळायला हवे, हीच आमची मागणी आहे.’’ सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाकडून चांगली कामगिरी होताना दिसत नाही; पण ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये मात्र वेस्ट इंडिजकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. श्रीलंकेमध्ये २०१२ साली झालेला ट्वेन्टी-२० विश्वचषकाला वेस्ट इंडिजने गवसणी घातली होती.