२०१९ विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने त्रिशतकी मजल मारली आहे. सलामीवीर जेसन रॉय, जो रुट, कर्णधार इयॉन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला ३११ धावांचा पल्ला गाठून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून लुन्गिसानी एन्गिडीने ३ बळी टिपले.

अवश्य वाचा – विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात इम्रान ताहीरचा अनोखा विक्रम

नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकीपटू इम्रान ताहीरने पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टोला माघारी धाडत इंग्लंडला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर जेसन रॉय आणि जो रुट यांनी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. फेलुक्वायोने जेसन रॉयला माघारी धाडलं, त्याने ५४ धावा केल्या.

यानंतर जो रुटने कर्णधार मॉर्गनच्या साथीने आणखी एक भागीदारी रचत सामन्यावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. रुट आणि मॉर्गन आपापली अर्धशतक झळकावत माघारी परतले. यानंतर मैदानावर आलेल्या बेन स्टोक्सने तळातल्या फलंदाजांना हातीशी धरत आक्रमक फटकेबाजी केली. त्याने ७९ चेंडूत ८९ धावा केल्या. आफ्रिकेच्या सर्व गोलंदाजांचा इंग्लंडच्या फलंदाजांनी आज यथेच्छ समाचार घेतला. एन्गिडीने ३ तर ताहीर आणि रबाडा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.