पॅरिस : क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरेओ पुरस्कारासाठी यंदा सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि स्पेनची महिला फुटबॉलपटू ऐताना बोनमती यांची निवड करण्यात आली. जोकोविचने गेल्या वर्षी एटीपी फायनल्ससह तीन ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारकीर्दीत विक्रमी २४ ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळवणारा जोकोविच पाचव्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला. जोकोविचने येथेही स्वित्झर्लंडचा २० ग्रँडस्लॅम विजेता माजी टेनिसपटू रॉजर फेडररशी बरोबरी केली. माद्रिद येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा >>>IPL 2024 : ऋतुराज गायकवाडने झळकावले ऐतिहासिक शतक, CSK साठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

‘‘मी सर्वप्रथम २०१२ मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. आता १२ वर्षांनंतर पुन्हा हा पुरस्कार मिळाल्याचा मला अभिमान वाटतो,’’ असे जोकोविच म्हणाला.

महिला विभागात या पुरस्काराची मानकरी ठरलेली बोनमती हा सन्मान मिळवणारी पहिली फुटबॉलपटू ठरली आहे. या वेळी महिला विश्वचषक विजेत्या स्पेन संघाचाही सन्मान करण्यात आला. प्रथमच ही स्पर्धा जिंकल्याबद्दल त्यांना २०२३ वर्षातील सर्वोत्तम संघ म्हणून निवडण्यात आले. हे पुरस्कार २००० पासून दरवर्षी दिले जातात. क्रीडा क्षेत्रातील ६९ तज्ज्ञ या पुरस्कार्थींची निवड करतात.

अन्य विजेते

● सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू : ज्युड बेलिंगहॅम (फुटबॉलपटू, इंग्लंड)

● सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुनरागमन : सिमोन बाइल्स (जिम्नॅस्ट, अमेरिका)

● स्पोर्ट फॉर गुड पुरस्कार : राफेल नदाल फाऊंडेशन

● सर्वोत्तम अपंग खेळाडू : डिएडे डी ग्रूट (अपंग टेनिसपटू, नेदरलँड्स)

● सर्वोत्तम अॅक्शन क्रीडापटू : अरिसा ट्रू (स्केटिंग, ऑस्ट्रेलिया)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Djokovic recipient of the bonmati laureate award sport news amy
Show comments