लाचखोरीबाबत आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) उपाध्यक्ष मायकेल प्लाटिनी यांच्यावर तहहयात बंदी घालावी, अशी मागणी फिफाच्या नीतिमूल्ये समितीने केली आहे. फिफामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोपाखाली अध्यक्ष सेप ब्लाटर यांना यापूर्वीच बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच प्लाटिनी यांच्यावरही तीन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
प्लाटिनी यांचे कायदेशीर सल्लागार थिबौड डीअल्वीस यांनी सांगितले,की आमच्या अशिलांवर घालण्यात आलेली बंदीदेखील अवास्तव आहे. कोणताही पुरावा नसताना त्यांच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तहहयात बंदी घालण्याची मागणी म्हणजे आमच्या अशिलांवर विनाकारण केलेली कारवाई असेल. ते दोषी असल्याचा कोणताही ठोस पुरावा देण्यात आलेला नाही.
ब्लाटर यांच्या कायदेशीर सल्लागाराने कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.
दरम्यान, फिफाच्या अन्वेषण समितीने या ब्लाटर व प्लाटिनी यांच्याविरुद्ध चौकशीचा प्रारंभ केला आहे. पुढील महिन्यात या समितीचा अहवाल अपेक्षित असून त्यानंतर रीतसर कारवाई केली जाणार आहे.