एखाद्या खेळाडूची राष्ट्रीय संघात निवड होण्यामागे त्याने रणजी सामन्यांत केलेल्या कामगिरीचा फार मोठा मोलाचा वाटा असतो. रणजी क्रिकेट सामने हे उद्योन्मुख खेळाडूंसाठी आपल्यातील कौशल्य सिद्ध करून दाखविण्यासाठीचे महत्त्वाचे व्यासपीठ असते. यंदा २०१६-१७ मध्ये घेण्यात आलेली रणजी स्पर्धा ही अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरली आहे. यंदाच्या रणजी स्पर्धेत अनेक खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले, तर काही विक्रम देखील मोडले गेले. २०१६-१७ या वर्षात रणजी विश्वात मोडले गेलेल्या पाच विक्रमांवर एक नजर..

१. सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम-
ऋषभ पंत याने यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक जलद गतीने शतक ठोकण्याचा विक्रम केला. यंदाचा रणजी मोसम ऋषभसाठी खूप महत्त्वाचा ठरला. ऋषभने यंदाच्या मोसमात ९० च्याहून अधिक सरासरीने ९०७ धावा केल्या. दिल्लीचा युवा यष्टीरक्षक ऋषभने ८ नोव्हेंबर रोजी रणजीच्या इतिहासातील सर्वात जलद शतकी खेळी साकारली. झारखंड विरुद्धच्या सामन्यात ऋषभने केवळ ४८ चेंडूत शतकी खेळी साकारली. ऋषभने या सामन्यात ६७ चेंडूत १३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. कमीत कमी चेंडूत शतकी खेळी साकारण्याचा विक्रम याआधी राजेश बोरा आणि व्हीबी चंद्रशेखर यांच्या नावावर होता. दोघांनीही रणजी सामन्यात ५६ चेंडूत शतकी खेळी केली होती.

२. सर्वाधिक भागीदारीचा विक्रम-
वानखेडे स्टेडियमवर यंदा रणजीमध्ये नवा विक्रम रचला गेला. महाराष्ट्राच्या स्वप्निल गुगले आणि अंकित बावने यांनी तब्बल ५९४ धावांची विक्रमी भागीदारी केली. दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा सडेतोड समाचार घेत मैदनात दोन दिवस फलंदाजी केली. स्वप्निलने ३५१ धावा केल्या, तर बावने याने २५८ धावा ठोकल्या. या दोघांनी ७० वर्षांपासूनचा विक्रम मोडीस काढला. याआधी हा विक्रम विजय हजारे आणि गुल मोहम्मद यांच्या नावावर होता. विजय हजारे आणि मोहम्मद यांनी ५७७ धावांची भागीदारी केली होती.

३. दोन कर्णधारांची त्रिशतकी खेळी-
रणजीच्या एकाच मोसमात दोन संघांच्या कर्णधारांनी त्रिशतकी खेळी साकारण्याचा नव्या विक्रमाची नोंद यावेळी केली गेली. महाराष्ट्राचा कर्णधार स्वप्निल गुगले याने यावेळी नाबाद ३५१ धावांची खेळी साकारली होती, तर गोवा संघासाठी सगुन कामत याने नाबाद ३०४ धावांची खेळी केली होती.

४. तिघांच्या २५० हून अधिक धावा-
२०१६-१७ च्या रणजी मोसमात यंदा तब्बल तीन फलंदाजांनी २५० हून अधिक धावांची खेळी साकारली. रणजीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेत तीन फलंदाजांनी अडीचशेहून अधिक धावांची वैयक्तिक खेळी साकारण्याचा पराक्रम केला. महाराष्ट्र संघाच्या स्वप्निलने नाबाद ३५१, बावने याने नाबाद २५८ धावांची तर ऋषभ पंत याने नाबाद ३०८ धावांची खेळी साकारली.

५. सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम-
ऋषभ पंत याने जलद शतक ठोकण्याच्या विक्रमसह सर्वाधिक षटकारांचा विक्रम देखील यंदाच्या रणजी मोसमात मोडला. ऋषभने आपल्या पहिल्या आणि दुसऱया डावात मिळून तब्बल २१ षटकार ठोकले. पहिल्या डावात ऋषभने ११७ धावांच्या खेळीत ८ षटकार ठोकले होते, तर दुसऱया डावात आपल्या विक्रमी १३५ धावांच्या खेळीत १३ षटकार लगावले होते.