पीटीआय, नवी दिल्ली

रिंगणातील शानदार कौशल्य आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व या बळावर देशातील युवा बॉक्सिंगपटूंना प्रेरणा देणारा आशियाई सुवर्णपदक विजेता माजी बॉक्सिंगपटू डिंको सिंगचे गुरुवारी यकृताच्या कर्करोगामुळे निधन झाले.

मृत्युसमयी डिंको ४२ वर्षांचा होता आणि २०१७ पासून कर्करोगाशी त्याची झुंज सुरू होती. ५४ किलो वजनी गटात (बाँटमवेट) प्रतिनिधित्व करणाऱ्या डिंकोला गतवर्षी करोनाची लागण झाली, तसेच कावीळही झाली. या आजारपणांमुळे त्याची प्रकृती आणखी ढासळत गेली. त्याच्या पश्चात पत्नी बाबी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

डिंको सिंगने १९९८च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताला १६ वर्षांनी सुवर्णपदक जिंकून देण्याची किमया साधली होती. याआधी १९८२ मध्ये कौर सिंगने भारताला सोनेरी यश मिळवून दिले होते. ‘‘आम्ही महान बॉक्सिंगपटूला गमावले आहे,’’ अशी प्रतिक्रिया ऑलिम्पिकपात्र बॉक्सिंगपटू विकास कृष्णनने व्यक्त केली.

मणिपूरच्या डिंकाने वयाच्या १०व्या वर्षी उपकनिष्ठ गटात कारकीर्दीतील पहिले राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. भारतीय बॉक्सिंग क्षेत्रातील पहिला आधुनिक तारा म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली. सहा वेळा विश्वविजेत्या एमसी मेरी कोमला बॉक्सिंगची प्रेरणा डिंकोमुळेच मिळाली. १९९८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी भारतीय संघात डिंकोची सुरुवातीला निवड झाली नव्हती. परंतु आत्महत्या करण्याची धमकी दिल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले. मग त्याने आपली निवड सार्थ ठरवली. निर्भीड डिंकोने आशियाई सुवर्णपदक जिंकताना सोंताया वाँगप्रेट्स (थायलंड) आणि टिमूर तुलयाकोव्ह (उझबेकिस्तान) या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्यांना नामोहरम केले. याच वर्षी अर्जुन पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले. मग क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१३ मध्ये त्याला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले, परंतु उपउपांत्यपूर्व फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले.

सेनादलात क्रीडापटू म्हणून नोकरी करणाऱ्या डिंकोने इम्फाळच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) केंद्रात प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. परंतु आजारपणामुळे त्याला मर्यादा आल्या. उत्तरार्धातील बरीच वष्रे त्याने रुग्णालयात किंवा घरीच काढली. गतवर्षी कर्करोगाच्या उपचारासाठी त्याला हवाई रुग्णवाहिकेने इम्फाळहून नवी दिल्लीला नेण्यात आले. तेथून घरी परतल्यावर त्याला करोनाची लागण झाल्यामुळे महिनाभर उपचार घ्यावे लागले होते.

तो महान बॉक्सिंगपटू होता. मणिपूरमध्ये त्याची लढत पाहण्यासाठी मी रांगा लावायचे. त्यानेच मला प्रेरणा दिली. तो माझा नायक होता. त्याने अतिशय लवकर जग सोडल्याने बॉक्सिंगचे मोठे नुकसान झाले आहे. आयुष्य हे अत्यंत अनिश्चित आहे.

– एमसी मेरी कोम, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू

डिंको सिंगच्या निधनामुळे भारतीय बॉक्सिंग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या प्रेरणेने अनेक जण बॉक्सिंगकडे वळले. पुढील पिढीसाठीही त्याचा खेळ प्रेरणा देत राहील.

– अजय सिंग, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष

डिंको सिंगच्या निधनाने मला अतिशय दु:ख झाले आहे. देशातील दर्जेदार बॉक्सिंगपटू अशी त्याची ओळख होती. त्याने आशियाई क्रीडा स्पध्रेत जिंकलेले सुवर्णपदक देशात प्रेरणादायी ठरले.

– किरेन रिजिजू, केंद्रीय क्रीडामंत्री