इंग्लड दौऱ्यावर रवाना होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. परदेश दौऱ्यावर निघण्याआधी पाक क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंची चाचणी घेतली होती. त्यात एकूण १० खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सोमवारी संघातील तीन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर मंगळवारी आणखी सात खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे समजले. याच मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका होण्यास सुरूवात झाली आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ याने क्रिकेट बोर्डाच्या या अव्यवसायिक आणि बेजबाबदार कारभारावर ताशेरे ओढले. “पाकिस्तान संघातील जे खेळाडू सरावासाठी मैदानात आले होते, ते सारे एकत्रच सराव करत होते. अशा परिस्थितीत करोना संसर्गाचा धोका अधिक असतो हे समजलं पाहिजे होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा बेजबाबदार कारभार आणि खेळाडूंने न राखलेले सोशल डिन्स्टन्सिंग यामुळे असं घडलं आहे. याच खेळाडूंसोबत मी देखील मैदानावर सरावासाठी गेलो होतो, पण मी मात्र रोहल नाझीरपासून विशिष्ट अंतर राखून उभा होतो. तुम्हाला तंदुरूस्त आणि सुरक्षित राहायचं असेल, तर नियमांचे पालन करणे भागच आहे”, असे राशिद लतिफ म्हणाला.

२८ जून रोजी पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार होता. त्याआधी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने करोना चाचणी घेतली. त्यातून दहा खेळाडू करोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ या करोनाची लागण झालेल्या तीन खेळाडूंना क्वारंटाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण नंतर एकूण १० खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. यात फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या सात जणांचा समावेश आहे. पाकिस्तानचे १० खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, ‘एवढ्या साऱ्या खेळाडूंना करोनाची लागण कशी काय झाली?’, असा प्रश्न आकाश चोप्रानेही बोर्डाला विचारला.