किरान गोव्हर्सने साकारलेल्या ‘सुवर्णगोल’मुळे ऑस्ट्रेलियाला सलग पाचव्यांदा चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेवर आपले वर्चस्व निर्माण करता आले. यजमान ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात नेदरलँड्सचा २-१ अशा फरकाने पराभव केला.
अतिरिक्त वेळेतील पाचव्या मिनिटाला गोव्हर्सने अप्रतिम गोल करीत ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. नियोजित वेळेत हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता.
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या नेदरलँड्सच्या सँडर डी विनने १८व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करून संघाचे खाते उघडले. परंतु रसेल फोर्डने ३१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली.