भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे यजमान संघाला अवघ्या १५७ गुंडळाण्यात भारतीय संघाला यश आले आहे. भारतीय संघाचे फिरकी तसेच वेगवान गोलंदाजांची या सामन्यातील कामगिरी कौतुकास्पद आहे. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने ४ बळी घेत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडलं. कुलदीपला मोहम्मद शमीने चांगली साथ देत ३ फलंदाजांना तंबूत धाडलं. या दोघांनी मिळून सात गडी बाद केले तर युझवेंद्र चहल आणि केदार जाधवने अनुक्रमे २ आणि एका गड्याला तंबूत परत पाठवले. भारतीय गोलंदाजांसमोर यजमान संघाने अक्षरश: लोटांगण घालत्याचे दिसून आले. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या ३८ षटकांमध्ये बाद झाला.

भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचा अंदाज यावरून बांधता येईल की यावर्षी (२०१९) न्यूझीलंडने खेळलेल्या आधीच्या सर्व सामन्यांमध्ये ३०० धावांचा डोंगर उभारला होता. मात्र आज तोच संघ पूर्ण ५० षटके मैदानात टिकू शकला नाही आणि अवघ्या १५७ धावांवर तंबूत परतला. भारताविरुद्ध मालिका सुरु होण्याआधी ३ ते ११ जानेवारी दरम्यान न्यूझीलंड आणि श्रीलंकन संघादरम्यान तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका पार पडली. यामधील पहिल्या सामन्यात यजमान संघाने प्रथम फलंदाजी करत ३७१ धावांचा डोंगर उभा केला. या समान्यात पाहुण्या श्रीलंकन संघाला अवघ्या ३२६ धावा करता आल्या आणि न्यूझीलंडने सामना ४५ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्येही यजमान संघाने प्रथम फलंदाजी करत ३१९ धावा करत श्रीलंकेला २९८ धावांवर बाद केले आणि सामना २१ धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये न्यूझीलंडने मोठ्या धावसंख्येचा जोरावर श्रीलंकेवर विजय मिळवला. न्यूझीलंडने केलेल्या ३६४ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकन संघ अवघ्या २४९ धावांवर तंबूत परतला अन् यजमानांनी पाहुण्यांना एकदिवसीय मालिकेत ३-०ने धोबीपछाड दिली.

पण हाच संघ आज भारतीय गोलंदाजांसमोर अगदी फिका पडलेला दिसला. कर्णधार केन विल्यमसन आणि टेलर वगळता कोणताही खेळाडूला जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. दुसरीकडे भारताच्या मोहम्मद शमीने दोन्ही सलमीविरांना बोल्ड करत तंबूत पाठवले. त्यानंतर चहलने टेलर आणि लेथमला कॉट अॅण्ड बोल्ड केले. केदार जाधवनेही निकोलसची विकेट घेत आपले खाते उघडले. त्यानंतर कुलदीपने सेट झालेल्या विल्यमसनला शंकरकरवी झेलबाद केले. यजमान संघाचे शेपूटाचे तीन खेळाडू कुलदीपने आपल्या फिरकीमध्ये अवघ्या १० धावांमध्ये गुंडले.