पाच वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या विश्वनाथन आनंदने बुद्धिबळात एक काळ गाजवला असला, तरी भारताच्या अन्य खेळाडूंमध्येही भावी विश्वविजेता होण्याची क्षमता आहे. व्लादिमिर क्रॅमनिक किंवा बोरिस गेलफंड यांसारख्या महान बुद्धिबळपटूंचे प्रशिक्षण देशातील काही युवा प्रतिभावान खेळाडूंना लाभत आहे. वेगवेगळ्या वयोगटांत भारताकडे चांगले दर्जेदार खेळाडू असल्यामुळे भारत पुढील २५-३० वर्षे बुद्धिबळात महासत्ता म्हणूनच ओळखला जाईल, असा विश्वास महाराष्ट्राचे तिसरे ग्रँडमास्टर आणि अनुभवी बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केला.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे सहप्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता सहज बोलता..बोलता’ या कार्यक्रमात प्रवीण ठिपसे यांनी विविध मुद्दय़ांचे परखड विश्लेषण केले. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

‘‘भारतीय बुद्धिबळाचा चेहरा असलेला आनंद हा अव्वल १५मध्ये किती काळ राहील, हे सांगता येत नाही. पन्नाशी ओलांडल्यानंतर वय हा आनंदच्या मार्गात अडसर बनत आहे. वयोमानानुसार प्रत्येकाची बौद्धिक क्षमता कमी होत असताना आनंदकडून काही चुका होत आहेत. माजी जगज्जेता अनातोली कार्पोव्हच्या मते २८, तर आणखी एक माजी जगज्जेता गॅरी  कास्पारोव्हच्या मते ३७-३८ हे सर्वोत्तम कामगिरी करण्याचे वय असते. यापुढे आनंद खेळण्याची शक्यता कमी असली तरी त्याची विद्वत्ता कमी होणार नाही. उलट वयाच्या सत्तरीनंतरही विद्वान म्हणून आनंदचे मत ग्राह्य़ धरले जाईल. आनंदचा वारसदार म्हणून विदित गुजराथी आणि पेंटाल्या हरिकृष्ण यांच्याकडे पाहिले जात असले तरी कोणत्याही महान व्यक्तीचा वारसदार शोधणे म्हणजे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, असे मला वाटते,’’ असे आनंदच्या भवितव्याबाबत प्रवीण ठिपसे यांनी भाष्य केले.

जवळपास २००पेक्षा अधिक देशांमध्ये बुद्धिबळ मोठय़ा प्रमाणावर खेळला जात असला तरी या खेळाला अद्यापही ऑलिम्पिक मान्यता मिळालेली नाही. याविषयी ठिपसे यांनी सांगितले की, ‘‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (फिडे) ऑलिम्पिक मान्यतेसाठी प्रयत्नशील असली, तरी बुद्धिबळ हा शारीरिक क्षमतेचा खेळ नाही, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे म्हणणे आहे. विविध तज्ज्ञांच्या मतप्रवाहानंतरही ‘आयओसी’चे मन वळवणे अद्याप ‘फिडे’ला शक्य झालेले नाही.’’

(सविस्तर वृत्तांत रविवारच्या अंकात क्रीडा पानावर)