उत्कृष्ट सांघिक कौशल्य व पेनल्टी कॉर्नरबाबतची अचूकता याचा सुरेख समन्वय राखून भारतीय पुरुष संघाने श्रीलंकेची २०-० अशी धूळधाण उडविली व हॉकीतील साखळी गटात अपराजित्व राखले. गतविजेत्या भारताला उपांत्य फेरीत मलेशियाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.

एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने पूर्वार्धात ७-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. भारताकडून आकाशदीपसिंग ( ९ वे, ११ वे, १७ वे, २२ वे, ३२ वे व ४२ वे मिनिट) याने सहा गोल केले, तर रुपींदरपालसिंग याने करीअरमधील दोनशेवा सामना खेळताना पहिल्या, ५२ व्या व ५३ व्या मिनिटाला गोल नोंदविले. त्यापैकी पहिला गोल त्याने पेनल्टी स्ट्रोकद्वारा केला. हरमानप्रितसिंग (५वे, २१ वे व ३३ वे मिनिट) व मनदीपसिंग (३५ वे, ४३ वे व ५९ वे मिनिट) यांनीही प्रत्येकी तीन वेळा गोलपोस्टमध्ये चेंडू  तटविला. त्याखेरीज ललित उपाध्याय (५७ वे व ५८ वे मिनिट), विवेक प्रसाद (३१ वे मिनिट), अमित रोहिदास (३८ वे मिनिट) व दिलप्रितसिंग (५४ वे मिनिट) यांनीही गोल नोंदविण्यात यश मिळविले. भारताने वीस गोलांपेकी सात गोल पेनल्टी कॉर्नरद्वारा, एक गोल पेनल्टी स्ट्रोकद्वारा व उर्वरित १२ फिल्डगोल केले. श्रीलंकेने या सामन्यात तीन वेळा गोलरक्षक बदलले तरीदेखील त्यांना दारुण पराभव टाळता आला नाही.

या सामन्यातील शेवटची पंधरा मिनिटे भारताने गोलरक्षक सुरेंदरकुमार याला गोल सोडून पुढेच खेळविले. या कालावधीत भारतीय संघाने सहा गोल केले. फक्त एकदाच श्रीलंकेने भारतीय गोलाजवळ धडक मारली होती.

उपांत्य फेरीत यापूर्वीच स्थान मिळविणाऱ्या भारताने साखळी गटात अग्रस्थान राखताना पाच सामन्यांअखेर पंधरा गुणांची कमाई केली. या सामन्यांमध्ये त्यांनी एकूण ७३ गोल नोंदविले. पुरुष गटातील अन्य उपांत्य लढतीत पाकिस्तान व दक्षिण कोरिया यांच्यात सामना होईल.

भारतीय महिलांची चीनशी लढत

गतवेळी महिलांमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतास उपांत्य फेरीत गतवेळच्या रौप्यपदक विजेत्या चीनशी लढत द्यावी लागणार आहे. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत गतविजेत्या दक्षिण कोरियापुढे जपानचे आव्हान असणार आहे.