ICCच्या वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेत आयर्लंडने आपले गुणांचे खाते उघडले. पहिल्या दोनही सामन्यात सहज विजय मिळवणाऱ्या इंग्लंडला आयर्लंडने मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवून दिले नाही. कर्णधार इयॉन मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ३२८ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. पण पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी या दोघांच्या द्विशतकी भागीदारीच्या बळावर आयर्लंडने ४९.५ षटकात हे लक्ष्य पूर्ण केले आणि सुपर लीगमध्ये १० गुणांची कमाई केली.

आयर्लंडने केलेल्या या दमदार खेळीसह त्यांनी टीम इंडियाचा १८ वर्ष जुना विक्रम मोडला. नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने ३२६ धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. आतापर्यंत इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध यशस्वी पाठलाग केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या होती. तो विक्रम आयर्लंडने मोडला आणि ३२९ धावांचा यशस्वी पाठलाग केला.

३२९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा पहिला बळी लवकर बाद झाला. पण नंतर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी यांनी २१४ धावांची भागीदारी केली. स्टर्लिंगने १२८ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १४२ धावा केल्या. तर बल्बर्नीने ११२ चेंडूत १२ चौकारांसह ११३ धावा केल्या. याचसोबत या जोडीने भारताच्या युवराज-कैफ जोडीचाही विक्रम मोडला. त्यांनी १२३ धावांती भागीदारी केली होती.

पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी हे दोघे बाद झाल्यानंतर अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत केविन ओब्रायनच्या निर्णायक फटकेबाजीच्या (१५ चेंडूत नाबाद २१) जोरावर आयर्लंडने ७ गडी आणि १ चेंडू राखून सामना जिंकला.

त्याआधी, आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली, पण नंतर इयॉन मॉर्गनने दमदार फलंदाजी केली. त्याने ८४ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. त्याला चॉम बँटन चांगली साथ देत अर्धशतक (५८) झळकावले. तळाचे फलंदाज डेव्हिड विली (५१) आणि टॉम करन (नाबाद ३८) यांनीही चांगली खेळी केल्यामुळे इंग्लंडने ५० षटकात ३२८ धावांपर्यंत मजल मारली.