भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. माझ्यासाठी भारतीय जवान क्रिकेटपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. याआधीही गौतम गंभीरने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर रोखठोक मत व्यक्त केलं होतं. आता सहनशक्ती संपली आहे असा संताप गंभीरने व्यक्त केला होता.

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसंबंधी खेळण्यासंबंधी विचारण्यात आलं असता गौतम गंभीरने सांगितलं की, ‘हा निर्णय पूर्णपणे बीसीसीआयचा असणार आहे. पण मला वैयक्तिक मत विचारलं तर एक सामना सोडून देण्यास काही हरकत नाही. दोन पॉईंट्स इतके काही महत्त्वाचे नाहीत. माझ्यासाठी देशाचा जवान कोणत्याही क्रिकेट गेमपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. मी देशाला प्राधान्य देतो’.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर बोलताना गंभीरने म्हटलं होतं की, ‘फुटीरतावाद्यांशी चर्चा करता, पाकिस्तानशी चर्चा करतो, मात्र आता ही बातचीत टेबलवर नको, युध्दभूमीत व्हायला हवी. आता सहनशक्ती संपली आहे’.