महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसीचे तिन्ही चषक उंचावले. तसेच धोनीच्या कारकिर्दीत भारतीय संघाला अनेक नवे आणि तगडे खेळाडू मिळाले. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी ही त्यापैकी काही उदाहरणं आहेत. हे खेळाडू त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशात धोनीचंही योगदान असल्याचं सांगतात. परंतु, असेही काही खेळाडू आहेत ज्यांना भारतीय क्रिकेट संघात पुरेशा संधी मिळाल्या नाहीत. असे खेळाडू अधून-मधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, निवड समिती किंवा महेंद्रसिंह धोनीवर नाराजी व्यक्त करतात. अष्टपैलू खेळाडू मनोज तिवारी हा त्यापैकी एक खेळाडू आहे. मनोजने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करूनही आपल्याला पुरेशा संधी मिळाल्या नाहीत असं वक्तव्य मनोजने केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज तिवारीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अतुलनीय कामगिरी केली आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला केवळ १२ एकदिवसीय आणि ३ टी-३० सामने खेळण्याची संधी मिळाली. मनोजने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून एकिदवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर ११ डिसेंबर २०११ रोजी त्याने चेन्नईत खेळवण्यात आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं. त्या सामन्यानंतर त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर जुलै २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून त्याला वगळण्यात आलं. त्यानंतर परत कधीच त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली नाही. दरम्यान, आता त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये संधी न मिळाल्याची खंत व्यक्त केली.

मनोज तिवारीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर भाष्य केलं. तिवारी म्हणाला, सुरुवातीचे ६५ प्रथम श्रेणी सामने खेळल्यानंतर माझी सरासरी ६५ च्या आसपास होती. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात मी १३० धावांची खेळी साकारली होती. त्यापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात मी ९३ धावा फटकावल्या होत्या.

तिवारी म्हणाला, भारताच्या कसोटी संघात माझी निवड होणं जवळजवळ नक्की झालं होतं. परंतु, माझ्या जागी युवराज सिंहला संधी देण्यात आली. त्यामुळे मला भारताची टेस्ट कॅप मिळाली नाही. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही तसंच झाल. मी वेस्ट इंडिजविरोधात शतक झळकावलं, मला सामनावीराचा पुरस्कार मिळाला तरीदेखील निवड समितीने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. एखादा खेळाडू चांगलं खेळत असेल तर आपोआप त्याचा आत्मविश्वास वाढतो. परंतु, काही लोक तो आत्मविश्वास नष्ट करतात तेव्हा तो खेळाडू खचून जातो.

हे ही वाचा >> युवा खेळाडूंसह जिंकणे महत्त्वाचे! तिसऱ्या कसोटीतील विजयानंतर कर्णधार रोहित शर्माची भावना

यावेळी मनोज तिवारीला यावेळी विचारण्यात आलं की, “कोणामुळे तुझा तुझ्यावरचा आत्मविश्वास कमी झाला. यावर तिवारी म्हणाला, मला माहिती आहे ती व्यक्ती कोण आहे. परंतु, मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही. कारण मी एक परीपक्व व्यक्ती आहे.” यावर तिवारीला पुन्हा एकदा विचारण्यात आलं की, तुला संघातून वगळलं तेव्हा महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यामुळे तुझा रोख धोनीकडे आहे का? त्यावर तिवारी म्हणाला, हो, त्यावेळी धोनीच संघाचा कर्णधार होता. मला कधी संधी मिळाली तर मी नक्कीच धोनीला विचारेन की, शतक ठोकल्यानंतरही मला संघातून का वगळलं? प्रामुख्याने मी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याबद्दल विचारेन. कारण त्या दौऱ्यावर इतर खेळाडू धावा करत नव्हते. विराट, रोहित आणि सुरेश रैना यांच्यापैकी कोणाच्याही बॅटमधून धावा निघत नव्हत्या. माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही त्यामुळे मी नक्कीच धोनीला हा प्रश्न विचारेन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj tiwary says would ask ms dhoni why i was dropped from team india asc