भरवशाचा खेळाडू रोहित शर्मा हा पुन्हा मुंबई संघात परतल्यामुळे उत्तर प्रदेशविरुद्ध होणाऱ्या रणजी क्रिकेट लढतीसाठी मुंबईचे पारडे जड झाले असले तरी उत्तर प्रदेशकडेही अनुभवी खेळाडूंचा समावेश असल्यामुळे हा सामना चुरशीने खेळला जाईल असा अंदाज आहे. या सामन्यास येथे शनिवारी प्रारंभ होत आहे.
भारतीय संघाने या सामन्यात रोहित शर्मा, सुरेश रैना व भुवनेश्वर कुमार यांना खेळण्याची परवानगी दिली आहे. रैना व कुमार यांच्या समावेशामुळे उत्तर प्रदेशच्या गोलंदाजीची बाजू भक्कम झाली आहे. त्यामुळेच हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशने नुकत्याच झालेल्या लढतीत गुजरातला १५५ धावांनी हरविले असल्यामुळे त्यांच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे.
भारतीय संघातून वगळलेल्या प्रवीणकुमार याने पाच बळी घेतले होते तर सौरभकुमार याने दहा गडी बाद केले होते. या दोघांवरही उत्तर प्रदेशची भिस्त आहे. त्यांच्याबरोबरच पीयूष चावला, अंकित राजपूत व कुलदीप यादव हे अनुभवी गोलंदाजही उत्तर प्रदेशकडे आहेत. त्यामुळेच मुंबईच्या फलंदाजांची कसोटी ठरणार आहे.
रैना याने सांगितले, उभय संघांमधील सामना नेहमीच उत्कंठापूर्ण वातावरणात खेळला जातो. लागोपाठ दोन सामने जिंकल्यामुळे आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास बळकट झाला आहे. उत्तर प्रदेशने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये तेरा गुणांची कमाई केली आहे. मुंबईने तेवढय़ाच सामन्यांमध्ये सतरा गुण मिळविले असून साखळी गटांत आघाडी स्थान घेतले आहे. कर्णधार आदित्य तरे, श्रेयस अय्यर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सिद्धार्थ लाड यांच्याकडून फलंदाजीत सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत शार्दूल ठाकूर, धवल कुलकर्णी, बलविंदरसिंग संधू (कनिष्ठ) व विशाल दाभोळकर हे उत्तर प्रदेशच्या फलंदाजांना किती रोखतात यावरच मुंबईचे यश अवलंबून आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज दाभोळकर तसेच द्रुतगती गोलंदाज ठाकूर यांनी आतापर्यंत या मोसमात प्रत्येकी १४ बळी घेतले आहेत.