माँट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धा

स्पेनच्या राफेल नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याचा ६-३, ६-० असा धुव्वा उडवत माँट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. यासह नदालने नोव्हाक जोकोव्हिचला (३३ जेतेपदे) मागे टाकत आपल्या मास्टर्स १००० विजेतेपदांची संख्या ३५ वर नेली.

लाल मातीचा बादशाह समजल्या जाणाऱ्या नदालने आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच हार्डकोर्टवर इतक्या सहजपणे विजेतेपद कायम राखले. ‘‘सामन्यात दमदार सुरुवात करणे महत्त्वाचे होते. डॅनिलने चांगला खेळ केला, पण गेल्या आठवडय़ापासून बरेच सामने खेळावे लागल्यामुळे त्याच्याकडून अंतिम फेरीत सर्वोत्तम खेळ होऊ शकला नाही. आठवडाभरातील ही माझी सर्वोत्तम कामगिरी म्हणावी लागेल,’’ असे नदालने सांगितले.