नवीन वर्षात जपानच्या टोकिया शहरात ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना, भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये नवीन वाद सुरु झालेला आहे. पाकिस्तानी घोडेस्वार उस्मान खानने डिसेंबर महिन्यात घोडेस्वारी प्रकारात ऑलिम्पिक तिकीट मिळवलं. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उस्मान सध्या कसून तयारी करतो आहे. मात्र ऑलिम्पिकसाठी उस्मान जो घोडा वापरणार आहे, त्याचं नाव आहे ‘आझाद काश्मीर’. (पाकिस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीरला आझाद काश्मीर असं म्हटलं जातं) भारतीय ऑलिम्पिक संघटनेने उस्मानच्या या कृतीवर आक्षेप घेतला आहे.

International Equestrian Federation (FEI) ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१९ साली उस्मानने ऑस्ट्रेलियावरुन या घोड्याची खरेदी केली होती. पाकिस्तानमध्ये आल्यानंतर उस्मानने या घोड्याला ‘आझाद काश्मीर’ असं नाव दिलं. हाच घोडा उस्मान टोकियोला स्पर्धेत उतरवणार आहे. याच प्रकारात भारताच्या फवाद मिर्झानेही ऑलिम्पिक तिकीट मिळवलेलं असल्यामुळे, भारतीय ऑलिम्पिक संघटना पाक घोडेस्वाराविरोधात कायदेशीर तक्रार करण्याच्या तयारीत आहे. ऑलिम्पिक नियमावलीनुसार, ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारची राजकीय, धार्मिक कृत्य करण्याला मनाई आहे. भारत-पाकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या काश्मीर वादाच्या पार्श्वभूमीवर पाक घोडेस्वाराने आपल्या घोड्याला आझाद काश्मीर नाव दिल्यामुळे नियमांचा भंग झाल्याची तक्रार भारतीय ऑलिम्पिक संघटना करणार आहे.

“ऑलिम्पिक खेळांमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकीय कृत्य करणं हे नियमाला धरुन नाही. स्पर्धकांना अशा पद्धतीने चुकीचं वागण्याची मूभा देता कमा नये.” भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. दरम्यान पाकिस्तान घोडेस्वारी संघटेनेने या प्रकरणी, “ऑलिम्पिक समितीने आक्षेप नोंदवल्यास आम्ही उस्मानशी यासंबंधी चर्चा करु. याच घोड्याच्या साथीने उस्मानने ऑलिम्पिक तिकीट मिळवलं आहे. घोड्याला नाव देणं हे सर्वस्वी खेळाडूच्या हाती आहे”, अशी प्रतिक्रीया दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.