पीटीआय, लाहोर

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ठाम आहे. या स्पर्धेच्या सामन्यांसाठी ‘पीसीबी’ने लाहोर, कराची आणि रावळपिंडी या केंद्रांना पसंती दिली आहे.

पाकिस्तान आणि भारत या देशांतील राजकीय संबंध तणावपूर्ण आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानात झाल्यास भारतीय संघ त्यात सहभागी होण्याबाबत साशंकता आहे. ही अनिश्चितता लक्षात घेऊन चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संमिश्र प्रारूपात घेण्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) विचार करू शकेल. गेल्या वर्षीची आशिया चषक स्पर्धाही अशाच पद्धतीने झाली होती. संमिश्र प्रारूपानुसार, पाकिस्तान संघाचे सामने पाकिस्तानात आणि अन्य सामने श्रीलंकेत झाले होते. आता मात्र चॅम्पियन्स करंडकाचे संपूर्ण यजमानपद ‘पीसीबी’ला हवे आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. गेली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा २०१७ साली इंग्लंडमध्ये झाली होती.

भारतीय संघ पाकिस्तानात पाठवायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय सरकारकडून घेतला जातो, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वारंवार स्पष्ट केले आहे. तसेच आपण कोणत्याही देशाच्या क्रिकेट मंडळाला त्यांच्या सरकारच्या धोरणाविरोधात जाण्यास सांगणार नसल्याचे ‘आयसीसी’ने नमूद केले आहे. याच कारणास्तव, चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संमिश्र प्रारूपात घेण्याबाबत ‘आयसीसी’ला विचार करावा लागू शकेल. ‘पीसीबी’ने मात्र आपण ही स्पर्धा एकट्याने आयोजित करण्यात सक्षम असल्याचे ‘आयसीसी’ला कळवले आहे.

हेही वाचा >>>KKR vs DC : सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय, दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेट्सनी चारली धूळ

‘‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानात घेण्यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही या स्पर्धेचा कार्यक्रम ‘आयसीसी’ला पाठवला आहे. ‘आयसीसी’च्या सुरक्षापथकाने पाकिस्तानातील केंद्रांची पाहणी केली आणि आमच्या तयारीचा आढावा घेतला. आमच्यात खूप चांगली बैठक झाली. आम्ही स्टेडियममध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. याची माहिती आम्ही ‘आयसीसी’ला लवकरच देऊ,’’ असे ‘पीसीबी’चे अध्यक्ष मोहसिन नक्वी म्हणाले.

स्टेडियममध्ये सुधारणेला वाव

चॅम्पियन्स करंडकाच्या सामन्यांसाठी ‘पीसीबी’ने लाहोर, कराची आणि रावळपिंडी या केंद्रांची निवड केली असली, तरी स्टेडियममध्ये सुधारणा करण्यास बराच वाव असल्याचे मोहसिन नक्वी यांनी मान्य केले. कराची आणि लाहोर येथील स्टेडियम सध्या चांगल्या स्थितीत नाही. त्यामुळे स्टेडियममध्ये सुधारणा करण्यासाठी ‘पीसीबी’ आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.