महिला आयटीएफ टेनिस स्पर्धा
भारताच्या रश्मी तेलतुंबडे हिने आपलीच सहकारी ध्रुती वेणुगोपाळ हिच्यावर ६-३, ७-६ (७-२) मात करीत महिलांच्या एनईसीसी करंडक आयटीएफ टेनिस स्पर्धेत आव्हान राखले. अग्रमानांकित नीना ब्रॅचिकोवा हिनेदेखील आगेकूच राखली.
डेक्कन जिमखाना क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत रश्मी हिला वेणुगोपाळविरुद्ध विजय मिळवताना झगडावे लागले. तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला, तसेच तिने व्हॉलीजचाही कल्पकतेने उपयोग केला. जागतिक क्रमवारीत पहिल्या ऐंशी खेळाडूंमध्ये स्थान असलेल्या ब्रॅचिकोवा हिने अव्वल दर्जास साजेसा खेळ करीत भारताच्या अंकिता रैनावर मात केली. तिने हा सामना ६-२, ६-३ असा जिंकला. तृतीय मानांकित ताडेजा माजेरिक (स्लोवेनिया) हिने चीनची खेळाडू जिआ झिआंग लुई हिच्यावर ६-०, ६-१ असा दणदणीत विजय मिळविला. इस्त्रायलच्या केरेन लोमो हिने अपराजित्व राखताना द्वितीय मानांकित अ‍ॅलेक्झांड्रा क्रुनिक हिच्यावर ६-२, ६-३ असा सनसनाटी विजय नोंदविला. तिने क्रॉसकोर्ट फटक्यांचा बहारदार खेळ केला. रशियाच्या मार्गारेटा लाझारेवा हिने ओमानची खेळाडू फातिमा अल नभानी हिचे आव्हान ६-२, ६-३ असे परतविले. भारताची युवा खेळाडू ऋतुजा भोसले हिला पहिल्याच फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. थायलंडच्या नोप्पावन लेर्तचिनाकोरन हिने तिचा ६-२, ६-० असा धुव्वा उडविला.