विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या रोहित शर्माने बुधवारी नवा इतिहास रचला. त्याने १५३ चेंडूत नाबाद २०८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे एकदिवसीय प्रकारात तीन द्विशतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. रोहितच्या या सुवर्ण कामगिरीला एक योगायोग जुळून आल्यामुळे आणखी झळाळी लाभली. रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. त्यामुळे रोहितची आजची अविस्मरणीय खेळी रितिकासाठी खास भेट ठरली. रोहित शर्माने द्विशतक झळकावल्यानंतर ‘वेडिंग रिंग’च्या बोटाचे चुंबन घेऊन रितिकाला फ्लाईंग किसही दिला. यावेळी सर्व कॅमेरे रोहित शर्मा आणि रितिका यांच्यावर खिळले होते. त्यामुळे आता सोशल मीडियावर ‘विरुष्का’नंतर रोहित आणि रितिका दोघेही चर्चेचा विषय ठरत आहेत.

या सामन्यात रोहितने सुरुवातीला संयमी खेळी केली. मॅथ्यूजच्या पहिल्या षटकात त्याने एकही धाव घेतली नाही. मात्र, त्यानंतर रोहितने धावांची अक्षरश: लयलूट केली. त्याच्या २०८ धावांच्या खेळीत १३ चौकार १२ षटकारांचा समावेश आहे. यावरून रोहितने लंकन गोलंदाजांची किती धुलाई केली असेल याची कल्पना येऊ शकते. अखेरच्या काही षटकांमध्ये लंकेचे गोलंदाज रोहित शर्मासमोर पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसत होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ३९२ धावांचा डोंगर रचला.

तुझे आडनाव बदलू नकोस; रोहितचा अनुष्काला मजेशीर सल्ला

रोहित शर्माने २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले होते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच त्याने दुसरे द्विशतक झळकावले होते. यावेळी रोहितने त्याच्या कारकीर्दितील २६४ धावांची सर्वोच्च खेळी साकारली होती. रोहित शर्माशिवाय सचिन तेंडुलकर, ख्रिस गेल, मार्टिन गप्तिल आणि वीरेंद्र सेहवाग या खेळाडुंनी वनडेत द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलने झिम्बाब्वेविरुद्ध २१५ धावांची खेळी केली असून, न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलने वेस्ट इंडिजविरुद्ध २३७ धावांची नाबाद खेळी करत द्विशतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले होते. भारताचा धमाकेदार फलंदाज वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध २१९ धावांची तुफानी खेळी केली होती.