वयाच्या तिशीत तिने ग्रँडस्लॅम स्पर्धापैकी सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. क्रमवारीतही ती अव्वल स्थानी आहे, मात्र तरीही सेरेना विल्यम्सची विजयाची पर्यायाने जेतेपदांची आस कमी झालेली नाही. यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी होऊनही सेरेना समाधानी नाही. यावर्षी सेरेनाने सहा विविध स्पर्धाची जेतेपदे नावावर केली आहेत. परंतु ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत अमेरिकेच्याच स्लोअन स्टीफन्सकडून तिला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. विम्बल्डन स्पर्धेत जर्मनीच्या सबिन लिइस्कीने चौथ्या फेरीतच तिचे आव्हान संपुष्टात आणले होते. हे दुखरे पराभव सेरेना विसरलेली नाही, त्यामुळेच उर्वरित हंगामात आणखी जेतेपदे कमावण्यासाठी ती सज्ज झाली आहे. वर्षांतील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात अमेरिकन खुली स्पर्धा सेरेनाच्या घरच्या मैदानावर असणार आहे. या स्पर्धेत सेरेनाची कामगिरी जबरदस्त आहे. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सेरेना प्रयत्नशील आहे. पण त्याआधी तिचे लक्ष्य आहे टोरंटो येथे होत असलेल्या रॉजर्स चषक स्पर्धेचे जेतेपद.
मला या वर्षांत जी कामगिरी अपेक्षित आहे, तशी अजून झालेली नाही असे सेरेना प्रांजळपणे सांगते. खेळत असलेल्या प्रत्येक स्पर्धेचे जेतेपद पटकवावे ही माझी महत्त्वाकांक्षा आहे. कारकीर्दीतील ५३ जेतेपदे सेरेनाच्या या बोलण्याला पुष्टी देतात.