ऋषिकेश बामणे

मुंबई : सेक्टर १७, ऐरोली, नवी मुंबई येथील मुख्य रस्त्याला लागूनच एक पानविक्रीचे दुकान आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टी सांभाळताना रंजन शेट्टीला वयाच्या १०व्या वर्षांपासूनच वडिलांच्या कामात हातभार लागावा म्हणून हे दुकान सांभाळावे लागले. परंतु त्यानंतरही खो-खो खेळात कारकीर्द घडवण्याच्या निर्णयाला घरच्यांचा होणारा विरोध आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे डगमगून न जाता रंजनने जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या पुरुष विभागात सर्वोत्तम खेळाडूला दिल्या जाणाऱ्या ‘एकलव्य’ पुरस्कारावर नाव कोरले. आज खेळातील प्रगतीमुळे रेल्वेत कार्यरत असणाऱ्या रंजनमुळे शेट्टी कुटुंबाचा कायापालट झाला आहे.

छत्तीसगडला झालेल्या राष्ट्रीय स्पध्रेत रंजनने रेल्वेला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. एकेकाळी महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या रंजनला या यशाविषयी विचारले असता तो म्हणाला, ‘‘निश्चितच कारकीर्दीतील अविस्मरणीय असा हा क्षण होता. राष्ट्रीय स्पर्धा सुरू होण्यापूर्वी छत्तीसगडलाच झालेल्या सराव शिबिराचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. घरी परतल्यानंतर रथातून काढण्यात आलेली मिरवणूक मी कधीच विसरू शकणार नाही. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्यासाठी समाधान देणारा ठरला.’’

सलग सात राष्ट्रीय स्पर्धाव्यतिरिक्त दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही रंजन खेळला आहे. सरस्वती विद्यालयातून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या रंजनला विहंग क्रीडा मंडळातील मनोज पवार, प्रताप शेलार, रविराज परामणे आणि कानिफनाथ बांगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळाविषयी रंजन म्हणाला, ‘‘अन्य दाक्षिणात्य कुटुंबाप्रमाणेच माझ्या घरातूनही शिक्षणालाच पहिले प्राधान्य द्यावे, अशी माझ्या कुटुंबीयांची अट होती. परंतु शाळेमध्ये असल्यापासूनच मला खो-खोची आवड निर्माण झाली. त्यामुळे अनेकदा मी पालकांना न सांगता स्पर्धा खेळण्यासाठी जायचो. अखेरीस खेळामुळेच जेव्हा मला नोकरीची संधी उपलब्ध झाली, तेव्हा त्यांची विचारसरणी बदलली.’’

रंजनचे वडील गेली २५ वर्षे पानपट्टीच्या व्यवसायाच्या बळावर घर चालवत होते. मग रंजन २०११पासून रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत झाल्यामुळे कुटुंबाच्या चांगल्या दिवसांना प्रारंभ झाला. २०११मध्येच आंतर-रेल्वे स्पर्धेनिमित्त रंजनला वाणिज्य शाखेतील पदवीच्या दुसऱ्या वर्षांचा अडथळा ओलांडता आला नाही. मात्र आता उच्चपदावर विराजमान होण्यासाठी पदवीपर्यंतचे प्रशस्तिपत्रक अनिवार्य असल्याने तो पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळला असून गतवर्षीच त्याने १४वीची परीक्षा दिली. सध्या तो पदवीच्या अखेरच्या वर्षांसाठी जोमाने तयारी करीत आहे. त्याशिवाय २०१६मध्ये हाताला झालेल्या गंभीर दुखापतीतून सावरण्यासाठी क्लबने आर्थिक सहकार्य केल्यामुळे सहा महिन्यांच्या अवधीनंतर रंजन पुन्हा मैदानात परतला.

अन्य मुलांच्या वडिलांप्रमाणेच माझ्याही मुलाने भरपूर शिकून स्वत:चे नाव कमवावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळेच मी सुरुवातीला रंजनला खेळण्यास विरोध करायचो. परंतु तो नेहमीच मला आश्वासने द्यायचा की याच खेळाद्वारे एक दिवस मी तुमचे नाव उज्ज्वल करेन. आज माझ्यापेक्षाही तोच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात मोलाची भूमिका बजावतो आहे, हीच माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

-श्रीधर शेट्टी, रंजनचे वडील