बुद्धिबळपटू गेली सात वर्षे अर्जुन पुरस्कारापासून वंचित आहेत. पुढील वर्षी जेव्हा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा होईल, तेव्हा भारताच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील जेतेपदाची योग्य दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केली.

रविवारी भारताने रशियासह बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे संयुक्त विजेतेपद पटकावले. अर्जुन आणि खेलरत्न या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आनंदने देशातील बुद्धिबळपटूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीची दारे खुली करावी, असे आवाहन केले. ‘‘ऑलिम्पियाडमधील यश बुद्धिबळ क्रीडा प्रकारासाठी सकारात्मक ठरावे. अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी क्रीडा मंत्रालयाने बुद्धिबळाचा पुनर्विचार करावा,’’ असे मत आनंदने व्यक्त केले.

२०१३ मध्ये अभिजीत गुप्ताला मिळालेला अर्जुन पुरस्कार हा बुद्धिबळातील अखेरचा सन्मान होता. याशिवाय १९८६ मध्ये रघुनंदन गोखले आणि २००६ मध्ये कोनेरू अशोक या दोन प्रशिक्षकांनाच बुद्धिबळातील द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे. ‘‘काही वेळा आपले अस्तित्व आहे, हे दाखवावे लागते. ऑलिम्पियाडच्या निकालामुळे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येईल,’’ असे आनंदने सांगितले.

सव्‍‌र्हरमधील बिघाड आणि इंटरनेट खंडित झाल्यामुळे निहाल सरिन आणि दिव्या देशमुख यांना अंतिम सामन्याच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. परंतु ‘फिडे’ने अनपेक्षितपणे भारताने मागितलेली दाद ग्राह्य़ धरल्याचे आनंदने सांगितले. भारतीय संघात अनुभवी आनंदसह विदित गुजराथी (कर्णधार), पी. हरिकृष्ण, अरविंद चिदम्बरम, कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका, भक्ती कुलकर्णी आणि आर. वैशाली यांचा समावेश होता.

‘‘करोनाच्या साथीमुळे ऑलिम्पियाड स्पर्धा वर्षभर पुढे ढकलण्याची शक्यता होती, परंतु त्याऐवजी ती ऑनलाइन पद्धतीने घेण्याची संकल्पना यशस्वी ठरली. स्पध्रेचे बदललेले स्वरूपही कौतुकास्पद होते,’’ असे आनंद या वेळी म्हणाला.

..तर दुसरी फेरी पुन्हा खेळवावी!

आमचा युक्तिवाद अमान्य करून रशियाला जेतेपद बहाल केले असते तर अंतिम सामना पुन्हा खेळवावा, या मागणीच्या मी तयारीत होतो, असे आनंदने सांगितले. ‘‘अंतिम सामन्यातील दुसरी फेरी पुन्हा खेळवावी, या मागणीसाठी मी मानसिक तयारी केली होती. रशियाला हा प्रस्ताव अजिबात आवडला नसता. परंतु ‘फिडे’ने विजेतेपद विभागून देत आम्हाला न्याय दिला,’’ असे आनंदने सांगितले. ‘‘एखादा संघ जोडणी खंडित झाल्यामुळे डाव हरला, तर त्याबाबतचे नियम अत्यंत स्पष्ट आहेत. परंतु सव्‍‌र्हर खंडित झाले, हा आमचा दोष नाही. समस्या ही आमच्या बाजूने नव्हती, याची त्वरित पडताळणी करण्यात आली,’’ असे आनंद म्हणाला.

वैयक्तिक कामगिरीबाबत असमाधानी

ऑलिम्पियाडमधील माझी कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती, परंतु संघावर माझी मोठी भिस्त होती, असे आनंदने सांगितले. अंतिम सामन्यातील फक्त एकच डाव खेळण्यासंदर्भातील निर्णयाविषयी आनंद म्हणाला, ‘‘होय, मी उपकर्णधार एन. श्रीनाथकडे अंतिम सामन्यात फक्त एकच डाव खेळण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. कारण आमचा संघ मजबूत असल्याने योग्य रणनीती वापरावी. माझ्याशिवाय संघाने बलाढय़ चीनला नामोहरम केले. या विजयाने आत्मविश्वास उंचावला,’’ असे आनंदने सांगितले.

बुद्धिबळातील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते

* अर्जुन पुरस्कार (१७) :

मॅन्युएल आरोन (१९६१), रोहिणी खाडिलकर (१९८०), दिब्येंदू बारूआ (१९८३), प्रवीण ठिपसे (१९८४), विश्वनाथन आनंद (१९८५), डी. व्ही. प्रसाद आणि भाग्यश्री ठिपसे (१९८७), अनुपमा गोखले (१९९०), सुब्बरामन विजयालक्ष्मी (२०००), के. शशीकिरण (२००२), कोनेरू हम्पी (२००३), सूर्यशेखर गांगुली (२००५), पी. हरिकृष्ण (२००६), द्रोणावल्ली हरिका (२००८), तानिया सचदेव (२००९), परिमार्जन नेगी (२०१०), अभिजीत गुप्ता (२०१३)

* द्रोणाचार्य पुरस्कार (२)

रघुनंदन गोखले (१९८६), कोनेरू अशोक (२००६)