जुन्या वादग्रस्त ट्वीट्समुळे इंग्लंडचे क्रिकेटपटू सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनला निलंबित केल्यानंतर आता आणखी काही क्रिकेटपटू आपल्या जुन्या पोस्टमुळे वादात अडकण्याची शक्यता आहे. यात इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन, जेम्स अँडरसन, जोस बटलर, डोम बेस यांचा समावेश आहे. आयपीएलमधील संघही त्यांच्यावर कारवाई करू शकतात. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे (केकेआर) कर्णधारपद सांभाळत असलेला ईऑन मॉर्गन आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलमवर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. केकेआर या दोघांविरुद्ध मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – नवऱ्याच्या संघातील क्रिकेटपटूचा ‘गजनी’ लूक पाहून साक्षी धोनी झाली ‘इम्प्रेस’!

२०१८मध्ये इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार मॉर्गन आणि यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर यांनी भारतीय चाहत्यांची थट्टा करण्यासाठी ‘सर’ हा शब्द वापरला. नंतर मॅक्क्युलमही या दोघांच्या संभाषणात सामील झाला. यात गुंतलेल्यांपैकी काही जणांनी ही पोस्ट काढून टाकली, पण त्यांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर म्हणाले, “याक्षणी टिप्पणी देण्यासाठी आम्हाला याबद्दल फारसे माहिती नाही. कोणत्याही निष्कर्षावर येण्यापूर्वी सर्व तथ्य जाणून घ्यावी लागतील. केकेआरकडून कोणत्याही भेदभावाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारले जाईल.”

हेही वाचा – गेल्या वर्षी करोनाला ‘पंच’ देणारे भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचे निधन

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आक्षेपार्ह ट्विटमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ओली रॉबिनसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले. ”रॉबिनसनच्या प्रकरणानंतर आम्ही सतर्क झालो आहोत. म्हणूनच आम्ही यापूर्वीही इतर बर्‍याच खेळाडूंनी केलेल्या वादग्रस्त पोस्टवर लक्ष ठेवून आहोत. आमच्या खेळात भेदभावाला स्थान नाही. आम्ही आवश्यक पावले उचलण्यास वचनबद्ध आहोत. ही केवळ एका प्रकरणाशी संबंधित बाब नाही. प्रत्येक प्रकरण वेगळ्या प्रकारे पाहता येईल. सर्व वस्तुस्थितीचा आढावा घेत पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल”, असे ईसीबीने सांगितले आहे.