पाटलीपुत्र येथील बंदिस्त क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या पुरुष व महिला अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी विजयी सलामी दिली.
उद्घाटनाच्या लढतीत ‘अ’ गटात महाराष्ट्राने प. बंगालला ४०-१७ असे सहज नमविले. ज्या प. बंगालने १९८१ ला महाराष्ट्राची विजयी परंपरा खंडित केली, त्या बंगालला आज महाराष्ट्राने नमविले. मध्यंतराला २४-८ अशी भक्कम आघाडी घेत महाराष्ट्राने सुरुवात झोकात केली. मध्यंतरानंतर संयमाने खेळ करीत आहे ती आघाडी कमी होणार नाही. उलट वाढत जाईल याची काळजी घेत आपला विजय निश्चित केला.
अभिलाषा म्हात्रे, दीपिका जोसेफ यांच्या जोरदार चढायांना बंगालकडे उत्तर नव्हते. त्याला किशोरी शिंदे, मीनल जाधव, स्नेहल साळुंखे यांच्या बचावाची मिळालेली भक्कम साथ त्यामुळे हे शक्य झाले.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने व गटात झारखंडचा ५९-३९ असा पाडाव करीत साखळीतील पहिल्या विजयाची नोंद केली.
रिशांक देवाडिगा, नितीन मदने यांच्या आक्रमक चढाया त्याला भूषण कुळकर्णी यांनी उत्तम बचाव करीत दिलेली मोलाची साथ त्यामुळे महाराष्ट्राने मध्यंतरालाच २३-१७ अशी आश्वासक आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर थोडी आक्रमकता वाढवत आणखी २७ गुणांची भर घातली व २० गुणांनी सामना खिशात टाकला