पट्टाया (थायलंड) : माजी जगज्जेती मीराबाई चानू हिने आपल्या राष्ट्रीय विक्रमापेक्षा सरस कामगिरी साकारली असली तरी तिला जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ४९ किलो वजनी गटात पदकाने हुलकावणी दिली.

२५ वर्षीय मीराबाईने तिन्ही प्रकारांत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. स्नॅच प्रकारात ८७ किलो वजन उचलल्यानंतर तिने क्लीन आणि जर्क प्रकारांत ११४ किलो वजनासह एकूण २०१ किलो वजन उचलण्याची करामत केली. तरीही तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. एप्रिल महिन्यात चीन येथे झालेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने एकूण १९९ किलो वजन उचलत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. चीनच्या जियांग हुईहुआ हिने २१२ किलो वजन उचलत नवा विश्वविक्रम रचत सुवर्णपदक पटकावले. चीनच्या होऊ झिहुई हिने २११ किलो वजन उचलत रौप्यपदक प्राप्त केले. उत्तर कोरियाच्या री साँग गुम हिला २०४ किलो वजनासह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

स्नॅच प्रकारात ८७ किलो वजनाची नोंद केल्यानंतर मीराबाईने क्लीन आणि जर्क प्रकारांत ११० किलो वजन उचलत शानदार सुरुवात केली. तिने नंतर यशस्वीपणे ११४ किलो वजन उचलले. पण तिसऱ्या प्रयत्नांत ती ११८ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिने ११८ किलो वजन उचलले असते तर तिला कांस्य आणि क्लिन आणि जर्क प्रकारांत रौप्यपदक मिळवता आले असते.

महिलांच्या ५५ किलो वजनी गटात भारताच्या स्नेहा सोरेनने साखळी फेरीत १७३ किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले होते. स्नॅच प्रकारात ७२ किलो वजन उचलत ती पाचव्या क्रमांकावर होती. पण क्लिन आणि जर्क प्रकारांत १०१ किलो वजन उचलण्याची किमया केल्यामुळे ती पहिल्या क्रमांकावर आली. अंतिम वजन पडताळणी झाली तेव्हा ती दुसऱ्या क्रमांकावर होती.