‘तळवळकर्स क्लासिक’ राष्ट्रीय स्पर्धेच्या विजेत्या यतिंदरचे रहस्य

‘‘मेहनत करनेवालो की कभी हार नहीं होती,’’ हा बॉलीवूडच्या चित्रपटातला एक टाळ्याखाऊ संवाद वाटेलही. पण हे बोलणाऱ्याने याच मेहनतीच्या जोरावर रौप्यचे सुवर्णपदक करून दाखवले. अशी काही स्वप्ने तो आपल्याबरोबर अजूनही बाळगत आहे. ही स्वप्ने प्रत्यक्षात उतरवून यशाचे इमले रचतो आहे. ही गोष्ट आहे ती उत्तर प्रदेशात एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, पण सध्याच्या घडीला शरीरसौष्ठव विश्वात आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या यतिंदर सिंगची! नुकत्याच झालेल्या ‘तळवळकर्स क्लासिक’ या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत यतिंदरने जेतेपदाला गवसणी घातली.

Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी

साल २०१५. यतिंदरला ‘तळवळकर्स क्लासिक’ याच स्पर्धेत रौप्यपदक मिळाले होते. या उपविजेते पदाची बोच त्याला कायम सलत होती. काही झाले तरी दुसऱ्यावरून तिसऱ्या क्रमांकावर जायचे नाही. पहिला क्रमांक पटकवायचाच, हे स्वप्न त्याने उरी जपले आणि अखेर ते प्रत्यक्षात आणून तो जेतेपदाचा मानकरी ठरला.

‘आपण झोपल्यावर जे स्वप्न पाहतो, ते काही क्षणांत विरून जाते. त्यामुळे स्वप्ने ही जागेपणीच पाहायची असतात. ती जपायची असतात. आणि प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला जिद्द आणि मेहनतीची जोड द्यायची असते. या स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न मी गेल्या २४ महिन्यांपासून पाहत होतो. त्यासाठी अथक प्रयत्न आणि सराव केला आणि जेतेपदाचे फळ मला मिळाले,’ असे यतिंदर म्हणाला.

आता विश्व अजिंक्यपदाचे ध्येय

तळवळकर क्लासिक स्पर्धेत मी जसे रौप्यचे सुवर्णपदकात रूपांतर केले, तसेच मला विश्व अजिंक्यपद स्पर्धेतही करायचे आहे. आतापर्यंत मी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे ध्येय मी उराशी बाळगले आहे, असे यतिंदरने आपल्या पुढील स्वप्नाविषयी सांगितले.

दिवसाला साडे चार तासांचा व्यायाम

शरीरसौष्ठव म्हटले की तुम्हाला नुसता जास्तीत जास्त व्यायाम करून चालत नाही. आपल्या शरीरानुसार व्यायामाची आखणी करावी लागते. मी सकाळी अडीच आणि संध्याकाळी दोन तास व्यायाम करतो. काही जणांना वाटेल हा किती कमी व्यायाम आहे. पण मी स्वत:चे शरीर कशा प्रकारचे आहे, हे समजून घेऊन त्यानुसार व्यायामाची आखणी केली आहे, असे यतिंदर म्हणाला

न्यूनगंड बाळगू नका

माझे पीळदार शरीर आता तुम्हाला दिसत असेल. पण शाळेत असताना फारच बारीक होतो. त्यावेळी शरीरसौष्ठव करू शकेन, असे मला वाटलेही नव्हते. उंची तर वाढवू शकत नाही, तर चांगले दिसण्यासाठी शरीर सुंदर ठेवायला हवे, असा विचार करत होतो. त्यानंतर सहज मित्रांबरोबर व्यायामशाळेत गेलो. काही महिने व्यायाम केल्यावर व्यायामशाळेच्या स्पर्धेत उतरलो. ही स्पर्धा जिंकलो आणि त्यानंतर आपण शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरू शकतो, हे मनाशी पक्के केले. त्यामुळे आपले शरीर सडपातळ आहे, हा न्यूनगंड बाळगू नका, असेही त्याने सांगितले.

यशानंतर पाय जमिनीवर राहायला हवेत

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, पण तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून लोक तेव्हाच ओळखतात जेव्हा तुमच्यावर चांगले संस्कार झालेले असतात. माझ्यावर केशव सर आणि घरच्यांनी चांगले संस्कार केले. यशाच्या उन्मादात तुम्ही भरकटलात की तुम्हाला मोठी मजल मारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक यश मिळवल्यावर तुमचे पाय जमिनीवरच असायला हवेत, हे संस्कार नेहमीच उपयोगी पडतात, असे यतिंदरने सांगितले.

हिऱ्याला पैलू पाडणे महत्त्वाचे

हिऱ्याला जोपर्यंत पैलू पडत नाहीत, तोपर्यंत त्याला किंमत नसते. मला एक खेळाडू म्हणून प्रशिक्षक केशव शर्मा यांनी पैलू पाडले आहेत. डेहराडूनवरून ते मला शिकवण्यासाठी यायचे. त्यांनी माझे शरीर घडवले. त्यांनी माझ्यासारख्या शरीरसौष्ठवपटुला पैलू पाडले आणि तेच सर्वात महत्त्वाचे आहे, असे यतिंदर म्हणाला.

यितदर सिंगला जेतेपद

षणमुखानंद सभागृहात भारतीय शरीरसौष्ठवपटू संघटनेच्या ‘तळवलकर्स क्लासिक’ स्पर्धेचा ज्वर टीपेला पोहोचला होता. कारण जेतेपद कोण पटकावणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. सभागृहात सुनीत जाधवच्या नावाच्या आरोळ्या ठोकल्या जात होत्या. पण चाहत्यांसारखे भावनेच्या भरात पंचांनी वाहून जायचे नसते आणि तेच या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले. पंचांनी फक्त पीळदार शरीरयष्टीकडे पाहिले, शरीरसौष्ठवपटूचे राज्य नाही. शरीरयष्टीच्या जोरावर सुनीतपेक्षा सरस असलेल्या उत्तरप्रदेशच्या यतिंदर सिंगच्या गळ्यात पंचांनी जेतेपदाची माळ घातली. २०१५ साली या स्पर्धेत यतिंदरने रौप्यपदक पटकावले होते. पण यावेळी मात्र त्याने स्पर्धेत बाजी मारत सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेचे आकर्षण असलेल्या मिश्र दुहेरी स्पर्धेत उत्तर प्रदेशची संजना दलाक आणि बिलाल राव ही जोडी विजयी ठरली आणि उत्तर प्रदेशने दुहेरी जेतेपदाचा मान पटकावला. प्रथमच झालेल्या सिंक्रोनाइज जोडीच्या प्रकारात सोनिया मित्रा आणि सनी रॉय या बंगालच्या जोडीने यश मिळवले. मधुकर तळवलकर यांच्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.