घराच्या मुख्य दरवाजावर जशी नेमप्लेट लावली जाते, तशाच स्वरूपाच्या नेमप्लेट्स हल्ली घरात अन्यत्रही लावल्या जातात. जिथे प्रत्येकाला स्वतची स्वतंत्र खोली असते, अशा घरांत आपापल्या खोलीच्या दारावर आपापल्या नावाची पाटी लावण्याची हौस अनेकांना असते. कपाटे, रेफ्रिजरेटरवर सुविचार लावणेही काहींना आवडते. अशा पाटय़ांवरील अक्षरे खाल्लेल्या फळांतून उरलेल्या बियांपासून तयार करता आली तर? अशा पर्यावरणस्नेही पाटय़ा कशा तयार करता येतील ते पाहू.

साहित्य :

कार्डबोर्ड, कार्डपेपर, धुवून स्वच्छ केलेल्या सीताफळाच्या बिया, अ‍ॅक्रेलिक ग्लिटर रंग, ब्रश, रंगाचे साहित्य, पेन्सिल, गम, वॉर्निश

कृती

  • कार्डबोर्ड पट्टी आडवी धरून वर कार्डपेपर चिकटवा.
  • हलक्या हाताने पुसटसर पेन्सिलने नाव किंवा सुविचार लिहा.
  • प्रत्येक अक्षरावर गम (फेव्हिकॉल) लावून सीताफळाच्या बिया चिकटवा.
  • सगळे नाव तयार झाल्यावर अ‍ॅक्रेलिक ग्लिटर रंगाने रंगवा.
  • व्यवस्थित वाळू द्या. मग शेवटी वॉर्निशचा हात फिरवा जेणे करून किडे-मुंग्या लागणार नाहीत व टिकाऊ होईल.
  • लोखंडी वस्तूवर लावणार असाल, तर पाटीच्या मागच्या बाजूस लोहचुंबक चिकटवा
  • लाकडी दारावर लावायचे असल्यास स्क्रू लावण्यासाठी छिद्रे पाडा.
  • गृहशांती, बारसे, मुंज, वाढदिवसासाठी अशा पाटय़ा भेट म्हणून देता येतील.

apac64kala@gmail.com