25 January 2021

News Flash

समाजशिक्षण

आलंकारिक पद्धतीने पुरुषांनी ‘आई’ व्हायला शिकलं पाहिजे हे मी लहानपणापासून ऐकलेलं आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

अनिल भागवत

आपला सर्वसाधारण समाज नवऱ्याला बायकोने ‘ए’ म्हणणं आणि नावाने हाक मारणं यांच्या फार पलीकडे गेलेला नाही. पुरुषांना फायदे घेण्याची सवयच झालेली आहे. मुलाला जन्म देणं आणि दूध पाजणं या दोन गोष्टींशिवाय पुरुषाला करता येणार नाही असं काहीच नसतं. म्हणूनच आपल्या समाजातल्या मुलग्यांना योग्य समाजशिक्षण देणं जास्त जरुरीचं आहे.

ज्या जोडप्यांचा विवाह झालेला आहे त्यांची शरीरं निरोगी असतील, पैसे नियमितपणे पुरेसे आणि वेळेवर असतील तर उरतो तो एकच प्रश्न; तो म्हणजे एकमेकांशी असलेली वागण्याची समज. सर्वसाधारणपणे पुरुषप्रधानतेच्या पगडय़ामुळे या बाबतीतली समज पुरुषाला कमी असते. पण हे पुरुषांचं शिक्षण करणार कोण?

आलंकारिक पद्धतीने पुरुषांनी ‘आई’ व्हायला शिकलं पाहिजे हे मी लहानपणापासून ऐकलेलं आहे. साने गुरुजींच्या गोष्टी ऐकल्यायत. ज्ञानेश्वरांना ‘माउली’ म्हटलेलं आपण वाचतो. मी आणि शोभाने शेकडो कार्यशाळा घेतल्यात. त्या सगळ्याच्या सगळ्या वेळा या विषयाचा संबंध आला आहे. भारतीय स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाल्यामुळे थोडेसे तरी बदल झाले. एका अभ्यासकांनी फार पूर्वी असं म्हटलं होतं की, नारी गुण आणि नर गुण हे निराळे मानायलाच लागतात. पण ज्या व्यक्तीत दोन्ही गुण असतात ती व्यक्ती आयुष्यात जास्त समाधानी असते. ‘स्त्रीमुक्तीची चळवळ असं नाव असलं तरी ती स्त्रियांच्या उद्धारासाठी नाही, तर पुरुषांच्या उद्धारासाठी आहे.’

प्रत्यक्षात आपला सर्वसाधारण समाज मात्र नवऱ्याला बायकोने ‘ए’ म्हणणं आणि नावाने हाक मारणं यांच्या फार पलीकडे गेलेला नाही. पुरुषांना फायदे घेण्याची सवयच झालेली आहे. मुलाला जन्म देणं आणि दूध पाजणं या दोन गोष्टींशिवाय पुरुषाला करता येणार नाही असं काहीच नसतं. त्याखेरीज पुरुष आणि स्त्री यांच्यात एकच मुख्य फरक आहे. पुरुषाची शारीरिक शक्ती सरासरीतच जास्त आहे. उंची, रुंदी, बा शरीररचना, स्नायूंची ताकद यामधे फरक असतो. मुलाला जन्म देण्याची जबाबदारी निसर्गाने स्त्रीवर टाकली असल्यामुळे तिचं शरीर चिवट बनलेलं असतं. मुली मुलांपेक्षा लवकर प्रगल्भ होतात. सहन करण्याची क्षमता हीदेखील एक प्रकारची ताकदच असते. शारीरिक वेदना सहन करण्यात स्त्रिया जास्त सक्षम असतात. कारण बाळाला जन्म देताना स्त्रियांना खूप वेदना सहन कराव्या लागतात. गर्भारपणाचे नऊ महिने आणि प्रत्यक्ष बाळाचा जन्म या काळात होणारी गैरसोय पुरुष सहन करू शकला नसता असं समजतात.

आपल्या समाजातल्या मुलग्यांना योग्य समाजशिक्षण देणं जास्त जरुरीचं आहे. त्या शिक्षणात स्त्रियांशी नीट वागण्याला महत्त्व हवं. वाईट असं की, या शिक्षणात स्त्रिया चार इयत्ता शिकतायत तर सरासरी पुरुष त्या विषयाच्या बालवाडीत प्रवेश घ्यायलाही तयार नाही. आपल्या देशाने लोकशाही हा मार्ग जाहीरपणे निवडलेला आहे. शारीरिक बळ पुरुषांमधे जास्त, अधिकार वापरण्याचा अनुभव पुरुषाला हजारो वर्षांचा, जवळजवळ प्रत्येक विवाहसंबंधामधे पुरुषाचं वय जास्त. असं असताना योग्य वागण्याची जास्त जबाबदारी सरळसरळ पुरुषाची नाही का?

समाजात तत्त्वत: दोन गट आहेत हे मान्य आहे. पण ते दोन गट स्त्री आणि पुरुष असे नाहीएत. समानता हे मूल्य मानणारे आणि समानता न मानणारे असे ते दोन गट आहेत. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातला मूळ विचार सांगतो. कुठल्याही दोन मानवांची शरीरं निराळी आहेत, याचा अर्थ मनं निराळ्या प्रकारे विचार करतील; म्हणजे दोन व्यक्ती या स्वतंत्रच असतात. कोणी कोणाला स्वातंत्र्य द्यायचं नसतं. ते त्या व्यक्तीकडे असतंच. याच तर्कविधानाप्रमाणे पुरुषाने स्त्रीला स्वातंत्र्य द्यायचं नसतं, ते स्त्रीकडे असतंच. ते समजण्याची, वापरण्याची पद्धत समजण्याचीच गरज आहे.

युनोने १९७५ हे महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. जवळजवळ निम्म्या अधिक देशांनी स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने जमेल तशी पावलं उचलली. त्या प्रक्रियेमधे काही गटांनी ‘विमेन ओन्ली’ असा आग्रह धरला. मुळात चांगल्या हेतूने सुरू केलेल्या प्रवासामध्ये अडचणी निर्माण झाल्या. विधायक कामं अनेक वर्षांनी मागे गेली. प्रतिक्रियांपैकी एक महत्त्वाची गैरसमजूत म्हणजे स्त्री-मुक्तीचा अर्थ स्वैराचार असा घेतला गेला. ‘फेमिनिझम’, ‘विमेन लिबरेशन’ या शब्दाचा पुरुषांनी चुकीचा अर्थ घेतलाच, पण काही स्त्रियांनीही घेतला. या विषयाची रास्त समज असलेल्या जगभरच्या कार्यकर्त्यांना हे घोटाळे निस्तरताना खूप त्रास झाला. अजूनही हा विषय नीट समजावून सांगताना भरपूर अडचणी समोर आहेत.

सर्वसाधारण कुटुंबांमधली भारतीय स्त्री कुटुंबासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करायला तयार होती. त्यात नवऱ्याबद्दलच्या ओढीपेक्षा अपत्यप्रेम ही गोष्ट जास्त महत्त्वाची होती. सगळीकडे अडचण अशी असते की, याबद्दलही राजकारणात, समाजकारणात, उद्योगधंद्यात निर्णय घेणारे बहुतेक सगळे पुरुषच असतात. सध्याची कुटुंबरचना बदलली पाहिजे, असं म्हटल्याबरोबर काही आर्यसंस्कृतिप्रेमी लोक स्त्री-मुक्तीवाले कुटुंबसंस्था नामशेष करायला निघाले आहेत, असा अतिशयोक्त अपप्रचार जाणूनबुजून करतात.

प्रत्यक्षात लोकशाही ही केवळ राज्यपद्धती नाही तर जीवनपद्धती आहे हे सगळ्यांना कळायला हवं. लोकशाहीत स्त्री आणि पुरुष समान असतात म्हणाल्यासरशी रोजच्या संसारातल्या आयुष्यातही ते समान असायलाच हवेत. अजूनही एखाद्या घरी मोलकरीण आली नसली तर बायकोने नवऱ्याचे कपडे धुतले पाहिजेत, ते तिचं कर्तव्यच आहे असं समजतात. या अशा अनेक गोष्टी बदलल्यावर पती-पत्नी-मुलं हे संबंध राहणार नाहीत असं नाही; पण त्यामागली प्रेरणा समतेची-स्वातंत्र्याची असेल आणि म्हणूनच ते संबंध अधिक जिव्हाळ्याचे असतील. कारण खरं निर्व्याज प्रेम हे स्वतंत्र-समान व्यक्तींमधेच असू शकतं हा मुख्य मुद्दा आहे.

एक गोष्ट आकडेवारीसंबंधातली आहे, पण त्याचा अर्थ गंभीर आहे. अप्रगत देशांच्यात, आशिया खंडात, भारत देशात जनगणनेमध्ये पुरुषांची संख्या थोडी जास्त आहे. प्रगत देशात म्हणजे इंग्लंड, उत्तर अमेरिका, कॅनडा, रशिया, स्कँडिनेव्हिया मधे स्त्रियांचं प्रमाण थोडं जास्त आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. काही ठिकाणी जन्म होण्यापूर्वीच स्त्रियांना स्त्री-पुरुष असमानतेचा दणका बसला. विचारशक्ती, बुद्धिमत्ता, प्रतिभा, जिद्द, धाडस, चिवटपणा, पृथक्करण शक्ती, दुसऱ्याला समजून घेण्याची इच्छा, भावनिक समज, कलागुण अशा व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंची खरोखर तुलना करायला बसलं आणि ‘सँपल’ म्हणून आपल्या स्वत:च्या ओळखीचे पाचपन्नास स्त्री-पुरुष घेतले तर त्याचं मला पटलेलं उत्तर असं आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यात काही गुण कमी-जास्त दिसतात. पण सारांशाने बघितलं तर दोन्हींपैकी मला कोणीही एक श्रेष्ठ किंवा कनिष्ठ सहज ठरवता येत नाही.

नवरा-बायकोचं सहजीवन या शब्दामधला ‘सह’ शब्द महत्त्वाचा आहे. सह म्हणजे एकत्र, एकमेकांसाठी, एकमेकांना, एकमेकांनी असंच आहे. तो कायम रहायला हवा.

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2018 4:34 am

Web Title: article about importance of proper social education
Next Stories
1 स्वावलंबन आणि आत्मसन्मान
2 व्यवस्थापन
3 वैवाहिक आयुष्यातलं व्यवस्थापन
Just Now!
X