२०२१ पासून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका गेल्या वर्षी बंद झाली. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ चांगलीच गाजली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे मालिकेतील शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशी अनेक पात्र घराघरात पोहोचली. एवढंच नाही तर प्रेक्षकांना ही पात्र आपल्या घरातली वाटू लागली. त्यामुळे आजही या पात्रांमध्ये झळकलेल्या कलाकारांना पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
काही दिवसांपूर्वी ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे लग्नबंधनात अडकला. २२ एप्रिलला चेतनने अभिनेत्री ऋजुता धारप हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं. नाशिकमध्ये चेतन व ऋजुताचा लग्नसोहळा पार पडला. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न झालं होतं. पण इंडस्ट्रीतील कलाकार मंडळी चेतन व ऋजुताच्या लग्नात जास्त दिसले नाहीत. असं का? तर यामागच्या कारणाचा खुलासा चेतनने केला आहे.
हेही वाचा – Video: “वजन वाढलं तर?”, मराठी अभिनेत्रीला आंब्यांवर ताव मारताना पाहून नवऱ्याचा प्रश्न, म्हणाली…
अभिनेता चेतन वडनेरेने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी चेतनला अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने विचारलं की, “लग्नासाठी २२ एप्रिल हिच तारीख का निवडली?” यावर अभिनेता उत्तर देत म्हणाला, “कारण लग्नाचं ठिकाण तेव्हाच उपलब्ध होतं.”
दुसऱ्या चाहत्याने विचारलं, “तुझ्या लग्नात ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेची टीम का नाही आली?” तेव्हा चेतन म्हणाला, “आम्ही अगदी दीडशे ते दोनशे लोकांमध्ये छोटेखानी लग्नसोहळा केला. त्यामुळे या इंडस्ट्रीतल्या आमच्या कुठल्याच अभिनेता-अभिनेत्री, दिग्दर्शन, निर्मिती विभागामधल्या मित्रमंडळींना बोलवू शकलो नाही. पण तरी त्या सगळ्यांनी त्यांच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचवल्या.”
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशाली ‘या’ मराठी अभिनेत्रीला म्हणाला करीना कपूर, फोटो व्हायरल
चेतनची थोडक्यात लव्हस्टोरी
चेतन व ऋजुताची ओळख ‘झी युवा’ वाहिनीवर ‘फुलपाखरू’ मालिकेत झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. चेतन व ऋजुता मूळचे नाशिकचे असल्यामुळे नाशिक प्रेमाने दोघांना आणखी जवळ आणण्यास मदत केली. दोघांमध्ये ५ वर्षांचं अंतर असल्याचं चेतनने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
दरम्यान, चेतनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेपूर्वी ‘लेक लाडकी या घरची’, ‘अलटी पलटी सुमडीत कलटी’, ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकांमध्ये काम केलं होतं. या मालिकांमधील चेतनच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.