News Flash

खाऊगल्ली अमृतसर : ‘अमृतसरी’ दावत

जगभरात प्रसिद्ध असलेल्या या सुवर्ण मंदिरातील लंगरमध्ये उत्कृष्ट जेवण मिळतं.

अर्शदीप सिंग जज

हृदयाचा रस्ता पोटातून जातो, असं पूर्वी म्हटलं जायचं. आताच्या रेडी टू इटच्या जमान्यात ते कितपत खरं मानायचं माहिती नाही, पण भटकंतीमध्ये नवं शहर जाणून घेताना शहराच्या पोटात शिरायचं असेल तर तिथल्या खाऊगल्लीला पर्याय नाही, हे खरं. रस्तोरस्ती मिळणारे खाद्यपदार्थ, त्यातलं वैविध्य पाहिलं की लक्षात येतं, शहराचं वैशिष्टय़ या खाऊगल्ल्यांमध्ये दडलेलं आहे. गावाला व्यक्तिमत्त्व देणाऱ्या, त्याचं वैशिष्टय़ जपणाऱ्या खाऊगल्ल्या आणि त्या निमित्ताने त्या गावा-शहरांची चवदार सफर या नव्या पाक्षिक सदरातून..

पंजाबी माणसं म्हणजे, सगळा दिलखुलास कारभार. ‘ओ जी. तुस्सी खाते जाओ बस्स..’ असं आपुलकीने बोलणारी, खाऊ घालणारी ही रंगीत पगडय़ांमधली सरदार मंडळी आपल्याला त्यांच्या आदरातिथ्याने खूश करून टाकतात. अमृतसरमधल्या खाद्यसफरीची सुरुवातही अशाच अजोड आदरातिथ्याने होते.

सुवर्ण मंदिरात डोकं टेकवून अनेकांची अमृसर सफर सुरू होते. जगभरात प्रसिद्ध असलेल्या या सुवर्ण मंदिरातील लंगरमध्ये उत्कृष्ट जेवण मिळतं. पंजाबमधील अंबरसर म्हणजेच अमृतसर. इतिहासाच्या खुणा वागवणाऱ्या या शहरातील नागरिक अत्यंत देशप्रेमी आहेत. पण ते अतिशय प्रेमळही आहेत. कोणत्याही दुकानात शिरलात तरी कधीच गिऱ्हाईकासारखी वागणूक मिळणार नाही. सत श्री अकाल म्हणत अत्यंत प्रेमाने आपलं स्वागत होतं.

इथे येऊन एकदा तरी चाखावा, असा प्रकार म्हणजे, लोहगढ भागातला ‘अमृतसरी फिश फ्राय’. मोहरीच्या तेलात तळलेला हा मासा चवीला अत्यंत सुरेख असतो. या फिश फ्रायचा एक खास मसाला माशाला लावून तो मुरवला जातो. मग तो गरम तेलात तळला जातो. आपल्या ताटात पडल्यावर हा आतून मऊशार पण बाहेरून कुरकुरीत असा पदार्थ खाणं म्हणजे बहार असते.

अमृतसरमधले एक प्रसिद्ध दुकान म्हणजे शर्मा स्वीट्स. या दुकानात मिळणारे गुलाबजाम म्हणजे साखरेच्या पाकात बुडालेला मखमली खव्याचा गोंडाच असतो जणू. तो चाखायलाच हवा.

पंजाबची खासियत असलेले पराठे, नान, रोटी आणि कुलचे इथे जितक्या आवडीने खाल्ले जातात तितक्याच चवीने केक आणि पेस्ट्रीजसुद्धा खाल्ले जातात. अमृतसरमधल्या प्रसिद्ध ‘ब्लूज बेकरी’तील केक, पेस्ट्रीज, कुकीज यावर तर लोकांचं विशेष प्रेम आहे. विविध रंगांचे, चवीचे, आकाराचे हे बेकरी पदार्थ खवय्याला भुरळ घालतात. अमृतसरमधल्या सक्र्युलर रोडवर ही बेकरी आहे.

अमृतसरी कुलचाबद्दल आपण ऐकलेलं असतं. पण तो इथेच येऊन खाण्यात मजा आहे. लॉरेन्स रोड, मजिठिया रोड इथे मिळणारा कुलचाच अस्सल असतो. मजिठिया रोडवरचा ‘हरबन्स छोले कुलचा’, रंजित अवेन्यू जवळील ‘अशोक कुलचेवाला’ यासोबतच अनेक जुन्या दुकानांतूनही कुलचा चांगला मिळतो. इथले दुकानदार आपल्या दुकानाची माहिती, इतिहास अगदी हौशीने सांगतात. शाकाहारासोबतच इथले मांसाहारी पदार्थही विशेष प्रसिद्ध आहेत. चिकन तंदुरी, चिकन टिक्का तर अनेक ठिकाणी मिळतातच. पण हकिमा गेट परिसरातील ‘बिल्ला चिकन हाऊस’ म्हणजे एकदम हॅपनिंग ठिकाण. यासोबतच इथले फ्रूट क्रीम आणि आम पापडही प्रसिद्ध आहेत. फ्रूट क्रीम फस्त करण्यात इथल्या स्थानिकांचा हात कोणी धरू शकत नाही. लोहगढमध्ये तर फ्रूट क्रीमची अनेक दुकानं आहेत. तर आपली आंबा पोळी म्हणजेच अमृतसरचे आम पापड.

अमृतसरच्या खाऊगल्लीचं एक वैशिष्टय़ म्हणजे इथे तुम्हाला अनेक पर्याय अत्यंत कमी किमतीमध्ये मिळतात. खाण्यापिण्याच्या किमती तशा कमी आहेत. त्यामुळे अमृतसरी सफर खिसा आणि पोट दोन्हीला खूश करणारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 12:31 am

Web Title: article about delicious food from amritsar
Next Stories
1 फॅशनेबल तारांबळ
2 पावसातल्या ‘फॅशन’सरी..
3 कल्लाकार : ‘शब्दसखा’
Just Now!
X