प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.

नमस्कार अमित,
मी सिद्धिका, एक नोकरदार स्त्री असून माझी उंची ५ फूट ६ इंच, वजन ७५ किलो आहे. मी बॉटम हेवी या कॅटॅगरीत मोडते. माझ्या शरीराच्या खालच्या भागाचे आकारमान वरच्या भागापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जीन्स-टॉप्स असे पोशाख घालणे मला अयोग्य वाटते. मला शोभून दिसतील अशा काही ड्रेसिंग स्टाइल्स आपण सांगू शकाल का?

हाय सिद्धिका,
मस्त उंच आहेस की तू! आणि बॉटम हेवी ही फक्त तुझीच नाही तर जवळपास सर्वच भारतीय स्त्रियांची समस्या म्हणावी लागेल. भारतीय स्त्रियांची बॉडी जनरली पीअर शेपच असते. आता खालचा भाग प्रमाणाबाहेर जाड असेल तर यासाठी आपले ड्रेसिंग असे हवे की, ज्यामुळे शरीररचना समतोल दिसेल. थोडक्यात, बघणाऱ्यांचे लक्ष वरच्या भागाकडे वेधून घेणे गरजेचे आहे. स्टायलिश नेकलाइन्स, कॅची प्रिंट्स, भरतकाम केलेले टॉप्स, लेसेस, फ्रील्स, गळ्याभोवती काम असलेले टॉप्स तुला घालता येतील.
एखादा ठळक नेकपीस, कूल स्कार्फ किंवा आकर्षक इअररिंग्ज हाही एक पर्याय असू शकतो. शिवाय छानसा हेअरकट करून घे. जास्त घनदाट केस आहेत, तिथे हेअरकलर लावता येईल. अर्थातच पाहणाऱ्याचे लक्ष तुझ्या शरीराच्या वरच्या भागावर केंद्रित होईल. माझ्या मते, तुला टय़ुनिक टॉप्स, टीशर्ट आणि लाँग स्कर्ट्स किंवा सेमीफिटेड जीन्स घालता येईल. रुंद बेल्ट लावत जा. यामुळे कमरेचा भाग सडपातळ दिसायला मदत होते आणि शरीर प्रमाणबद्ध भासते.

पारंपरिक ड्रेसिंगसाठी.. गो फॉर चुडीदार किंवा लांब- स्ट्रेट कट कुर्ता. अनारकली ड्रेसही चालेल, कारण त्यातही कमरेखालचा भाग झाकला जातो. पण सलवार, पतियाला सलवार, साडी, नो नो!
तू जीन्स खुशाल घाल. गडद निळ्या, काळ्या, किरमिजी, व्यवस्थित मापाच्या (फार घट्टही किंवा फार सैल नसलेल्या), गुडघ्याच्या खालपर्यंत नाही तर घोटय़ापर्यंतच्या लांबीच्याही चालतील. यामुळे तुझ्या एकत्रित लुककडे पाहताना तळाशी एक काल्पनिक आडवी रेषा असल्याचा आभास निर्माण होतो आणि शरीराच्या खालच्या भागाच्या आकाराचा तोल सांभाळायला मदत होते. लिनन कापडाच्या पँट हाही एक पर्याय असू शकतो. त्या अंगासरशी बसत असल्याने आपल्याला चांगला लुक मिळवून देतात.
जीन्स, साधारण लांबीचा टॉप आणि त्यावर लांब घोळदार श्रग (मऊ , उत्तम फॉल असणारा फ्लोई जाकीट/ कोट) असे ड्रेसिंग तुला ग्रेट लुक देईल किंवा लांब सैलसर टय़ुनिक्सही चालेल. एक सिम्पल फंडा सांगू का? योग्य प्रकारचे कपडे घातल्यानंतर आरशात स्वत:ला पाहताना, तुला, तुझी प्रतिमा जर प्रमाणबद्ध, आटोपशीर वाटली तर आपोआपच त्या ड्रेसिंग स्टाइलमध्ये तू आत्मविश्वासाने वावरशील.

(अनुवाद- गीता सोनी )
viva.loksatta@gmail.com