मिलिंद भणगे
शेवटी साऱ्या कलांमध्ये गोष्टच महत्त्वाची. डॉक्युमेण्ट्रीदेखील गोष्टीप्रधानच. तटस्थपणे माहिती देण्याची जबाबदारी खांद्यावर असली, तरीदेखील मनोरंजनाची अन्य फलाटे असताना एकाग्रता हरवलेल्या प्रेक्षकाला गुंतवण्यासाठी डॉक्युमेण्ट्रीत गोष्ट हवीच. ती कला एकदा आली की, विषयाची अधिकाधिक उकल होत राहते…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर गोष्टच सांगायची असते. एखाद्या व्यक्तीची, संस्थेची, घटनेची, प्रकल्पाची वा प्रक्रियेची! समाजमाध्यमावरची एखादी ‘पोस्ट’ असो किंवा पूर्ण लांबीचा चित्रपट… आपण गोष्टीच सांगत, ऐकत वा पाहत असतो. डॉक्युमेण्ट्री त्याला अपवाद ठरत नाही. माझ्या लेखी ती फिल्मचं असते, जी करताना तुमच्या हाती कलाकार, मोठ्ठं बजेट आणि हवं तेवढं मनुष्यबळ नसतं इतकंच! पण उपलब्ध संसाधनांतून गोष्ट सांगता येतेच. आजवर अशा अनेक गोष्टी सांगता आल्या. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एव्हरेस्ट मोहिमेची, गावचं जंगल राखून समृद्ध झालेल्या बारीपाड्याची, कन्याकुमारीला विवेकानंदांचं स्मारक साकारणाऱ्या एकनाथजी रानडेंची, नगरच्या स्नेहालयाची, गावपातळीवर काम करणाऱ्या जलदूतांची, एकतृतीयांश आयुष्य गड-कोटांवर भटकणाऱ्या गो. नी. दांडेकरांची… अशा अनेक…

गोष्ट रंजक, परिणामकारक व्हायची असेल तर सर्वात पहिलं आव्हान असतं ते कथासूत्र ठरवण्याचं! कथासूत्र ठरवून मग चित्रीकरण अथवा संकलनासाठीचा सारा ऐवज गोळा झाल्यानंतर कथासूत्र शोधणं या दोन्ही पद्धतीनं काम करता येतं. दोन्हींची आव्हानं आणि बलस्थानं वेगवेगळी आहेत, म्हणूनच डॉक्युमेण्ट्रीचं हे ‘लूज स्ट्रक्चर’ मला आवडतं. मला या दोन्ही पद्धतीनं काम करता आलं. कथासूत्र आधी ठरवल्यास त्याप्रमाणे लेखन, चित्रीकरण, संकलन, संगीत, मोशन ग्राफिक्स याचा विचार करता येतो. सिनेमॅटिक थिंकिंग करता येतं. ते झालं तर तुमचं निवेदन ‘प्रोटॅगनिस्ट’ होतं, तुमचे शॉट्स, संकलन, संगीत सहकलाकाराची ठोस भूमिका बजावतात आणि मुलाखती कथा पुढे नेणारी ‘गाणी’ होतात. अशी कोणतीही डॉक्युमेण्ट्री अनुभव देण्याची, रहस्यांची मालिका उलगडण्याची, माहितीच्या दालनात फिरवून आणण्याची, आठवणींच्या प्रदेशात रमवण्याची, अस्वस्थ करून सोडण्याची, विचारप्रवृत्त करण्याची, अनामिक प्रेरणेचा स्राोत होण्याची आणि (इच्छा असेलच तर) चर्चेची वा वादाची ठिणगी टाकण्याची क्षमता, ताकद राखते.

आणखी वाचा-चारशे कोटी विसरभोळे?

दोन वर्षांपूर्वी ‘किल्ले पाहिलेला माणूस’ ही गो. नी. दांडेकरांच्या किल्ले भ्रमंतीवर आधारित फिल्म केली. गोनीदांनी त्यांची गड- किल्ल्यांविषयीची दृष्टी आपल्या लेखनातून मांडून ठेवली होती. त्याचं दृश्यिक दस्तावेजीकरण करायचं होत. आधी स्क्रिप्ट तयार झालं. प्रमुख चित्रीकरण स्थळांची रेकी झाली. कॅमेरा अँगल्स, त्यानुसार लेन्सेस हे ठरवलं. बहुतेक शॉट्स वाइड अँगलमध्ये घेतले. ‘धावतपळत किल्ले पाहणं हा किल्ल्यांचा अपमान!’ ही गोनीदांची भूमिका! त्यांनी किल्ले निवांतपणे पाहिले. त्यामुळे दृश्यांना ठहराव दिला. फास्ट कटिंग केलं नाही. गोनीदांच्या मुलाखतीमधील तुकडे वापरले. सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी या दोघांच्या वाचिक अभिनयाने निवेदन प्रवाही झालं. ड्रोनचा वापर केल्याने जे साध्या नजरेला दिसणार नाहीत असे किल्ले पाहता आले. या फिल्मचं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रदर्शन झालं. अलीकडेच पुण्यात झालेल्या नामवंत साहित्यिकांवरील लघुपटांच्या महोत्सवात या फिल्मला उद्घाटनाचा मान लाभला.

‘तपस्या’ या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी केलेल्या मालिकेने अनोखा अनुभव दिला. ही डॉक्यु-सीरिज होती. या मालिकेत एका सामाजिक संस्थेवर एक एपिसोड (एक माहितीपट) असायचा. त्यातील जवळपास १५ भाग मी केले. ज्या संस्थेवर एपिसोड करायचा तिच्याविषयी ढोबळ माहिती असायची. संस्थेच्या कामाची ओळख प्रत्यक्ष चित्रीकरणाला गेल्यावर व्हायची. चित्रीकरणासाठी तीन दिवस (प्रवासाच्या वेळेसह) हाती असायचे. त्या धावपळीत कथासूत्र गवसलं तर त्यानुसार चित्रीकरण करता यायचं, अन्यथा चित्रीकरण झाल्यावर कथासूत्र ठरवावं लागे. उदाहरण द्यायचं झालं तर रत्नागिरीतील मंडणगड येथील स्नेहज्योती अंधशाळा! आता अशा शाळा चालवणं हे नवीन नाही. त्यामुळे दोन बहिणींनी त्यांच्या वडिलोपार्जित घरात सुरू केलेली आणि चालवलेली अंधशाळा हे सूत्र ठरवून चित्रीकरण केलं. प्रत्येक वेळी वेगळी आव्हानं असायची. नगरच्या स्नेहालयच्या कामाचा पसारा आणि आवाका मोठा… तो एका एपिसोडमध्ये सूत्रबद्ध पद्धतीने मांडताना दमछाक झाली. आटपाडीच्या शेती परिवार कल्याण संस्थेचं मुख्य काम बंदिस्त शेळीपालनाचं! त्यासाठी ‘आपण यांना पाहिलंत का?’ या दूरदर्शनवर पूर्वी येणाऱ्या कार्यक्रमावर आधारित एक उद्घोषणा सुचली. या उद्घोषणेत त्यांच्या कामाचं सार आणलं होतं. त्या उद्घोषणेने एपिसोडचा प्रारंभ आणि शेवट केला. २० मिनिटांचा एक एपिसोड असायचा. त्यासाठी किती पानं लिहायची? किती शूट करायचं? विशिष्ट डेडलाइनमध्ये एपिसोड पूर्ण करणं याचा अनुभव गाठीशी आला. माहितीपटांची ताकद या मालिकेने अधोरेखित केली. पण या मालिकेचे निर्माते एकनाथ सातपूरकर यांना अनेक दिव्यातून जावं लागलं.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण

अशा फिल्म करताना बजेटची चौकट अगदी घट्ट असते. त्यामुळे मर्यादित दिवसांत चित्रीकरण करणं हे दुसरं आव्हान असतं. त्या घटना ज्या ज्या वेळी घडतात तेव्हा त्या शूट करणं हे भाग्य फारच कमी वेळा प्राप्त होतं. एव्हरेस्ट मोहिमेने ती संधी दिली. गिरीप्रेमी या पुण्यातील संस्थेच्या हिमालय आणि सह्याद्रीतील पर्वतारोहण मोहिमांच्या साधारण १२-१५ छोट्या फिल्म्स मी केल्या होत्या. एव्हरेस्ट ही त्यांची महत्त्वाकांक्षी मोहीम होती. त्या मोहिमेचा नेता उमेश झिरपे मला आग्रहाने घेऊन गेला. जवळपास ७० दिवसांची ही मोहीम होती, त्यातले ४० दिवस १७,५०० फूट उंचीवर, एव्हरेस्ट बेस कॅम्पला राहायचं होतं. हे कठीण होतं. मी हौशी गिर्यारोहक आहे. हिमालयात उणे अंश तापमानात मी पहिल्यांदाच गेलो होतो. मी स्वत: बेसकॅम्पपर्यंतचा प्रवास शूट करणं आणि पुढील चढाईच्या शूटसाठी गिर्यारोहकांना मार्गदर्शन करणं अशी दुहेरी जबाबदारी होती. अशा मोहिमांमध्ये गिर्यारोहकच कॅमेरामन असतात. कारण अशा खडतर मोहिमा चित्रित करणारे कॅमेरामन मोजकेच. जे आहेत त्यांचं मानधन परवडत नाही. त्यामुळे मिळतील त्या शॉट्सवर समाधान मानावं लागत. शॉट्ससाठी गिर्यारोहकाचा जीव पणाला लावता येत नाही. ही सारी मोहीम रिपोर्ताजसारखी चित्रित करता आली. मोहिमेची घोषणा, गिर्यारोहकांची तयारी, निधी संकलनासाठीचे विविध कार्यक्रम, मोहिमेचं प्रस्थान, काठमांडूतील खरेदी, बेसकॅम्पपर्यंतचा प्रवास, तेथील घटना, प्रत्यक्ष चढाई, मोहीम यशस्वी झाल्यानंतरचा जल्लोष, यशस्वी गिर्यारोहक बेसकॅम्पला परतल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया, मोहीम पुण्यात आल्यानंतर झालेलं स्वागत, हे सगळं त्या त्या वेळी शूट केल्याने त्यात जिवंतपणा आला. हॅंडीकॅम, गोप्रो, प्रोफेशनल अशा विविध कॅमेऱ्यांवर शूट केलेलं हे फुटेज कथासूत्रात गुंफलं. त्यामुळे त्याला जुळणी करत करत मिळवलेलं यश याचा आनंद झाला. आजही ती फिल्म पाहताना ताजेपणा जाणवतो.

असाच काहीसा अनुभव जलदूत या प्रकल्पाने दिला. ज्यामध्ये ग्रामीण भागातील युवकांना पाण्याविषयीचं प्रशिक्षण दिलं जायचं. केवळ प्रशिक्षणावर न थांबता त्यांनी आपल्या गावात पाण्याविषयीच काम करायचं असा प्रकल्प होता. प्रशिक्षणापासून ते प्रत्यक्ष पूर्ण होईपर्यंत दोन वर्षांचा कालावधी असायचा. त्याचंही प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर शूट करत एकत्रित फिल्म केली.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…

या फिल्म्स बनवताना ‘एव्हरेस्ट’पासून ईशान्येच्या राज्यांपर्यंत आणि वेश्या वस्तीपासून गड-किल्ल्यांपर्यंत भ्रमंती झाली. विविध संस्था, वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं, दुर्गम ठिकाणं पाहता आली, अनुभवता आली. आवश्यक त्या ठिकाणी संघर्ष करत, अवतीभोवतीच्या समाजाशी समन्वय साधत किती तरी विधायक काम तळागाळात चालू आहे याची ओळख झाली. डॉक्युमेण्ट्रीसाठी आवश्यक प्राथमिक संशोधन हा माझा अत्यंत प्रिय भाग! पुस्तक वाचणं, माणसांना भेटणं, दृक् – श्राव्य ऐवज पाहणं, हे सारं तुम्हाला समृद्ध करणारं असतं. स्वत: फिल्म्स बनवत असताना जगभरातील डॉक्युमेंट्री पाहणं चालूच असतं. Bert Haanstra च्या ग्लास, झू, स्मिता पाटीलच्या आयुष्याचा वेध घेणारी ‘सर्चिंग फॉर स्मिता’, पहिला रॉकस्टार Paul Ankka याच्या जीवनावरील ‘लोन्ली बॉय’ आणि चीनच्या ‘एकच मूल’ या धोरणाची मीमांसा करणारी ‘वन चाइल्ड नेशन’ या माझ्या कायम आवडत्या डॉक्युमेण्ट्रीज् आहेत.

डॉक्युमेण्ट्रीपुढे असणारी आव्हानं पूर्वीपासून बदललेली नाहीत. किंबहुना त्यात भर पडली आहे. एखाद्या विषयावर तुम्ही स्वत:हून डॉक्युमेण्ट्री करायची ठरवता तेव्हा त्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवणं कठीण जातं. प्रेक्षकांची एकाग्रता कमी होतेय. ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेत तरी तिथपर्यंत पोहोचणं सर्वांच्या आवाक्यात नाही. अमेरिकेत डॉक्युमेण्ट्री बनवतानाच दीड तासाची बनवली जाते, थिएटरमध्ये रिलीज करता यावी, हे गृहीत धरून! प्रेक्षकही तिकीट काढून त्या पाहतो.

डॉक्युमेण्ट्री म्हणजे वास्तविक जीवनातील वा खऱ्याखुऱ्या माणसांच्या आयुष्यातील नाट्य टिपणं. अलीकडच्या काळात प्रेक्षक वास्तववादी कथांना पसंती देतोय. त्याचं प्रतिबिंब चित्रपटसृष्टीत आपण पाहतोय. ‘बेस्ड ऑन ट्रु स्टोरीज्’ किंवा ‘इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेण्ट्स’ ही पाटी आज सर्रास झळकताना दिसते. आपल्या अवतीभोवती अशा अनेक गोष्टी असतात. त्या प्रत्येकावर चित्रपट करणं सर्वार्थाने केवळ अशक्य! डॉक्युमेण्ट्री ती संधी तुम्हाला देते. डॉक्युमेण्ट्री या प्रकाराने फक्त माहिती देण्याची वा जनजागरण करण्याची जबाबदारी कळत-नकळत आपल्या खांद्यावर घेतली. डॉक्युमेण्ट्री बनवणारा तटस्थपणे विषयाचा तीर गाठू लागतो. आवश्यक असेल तेव्हा तो तीर गाठायलाही हरकत नाही. पण डॉक्युमेण्ट्री हेही गोष्ट सांगण्याचं प्रभावी माध्यम आहे, हे मानलं तर त्यात ओलावा, रसरशीतपणा येतो. बहुतेक वेळा बनवणाराच ‘डॉक्युमेण्ट्रीच करतोय रे’ या मन:स्थितीत असतो. परिणामत: पाहणाराही ‘पाहतोय ती डॉक्युमेंट्रीच आहे तर’ या भूमिकेत जातो. ‘अजिबात डॉक्युमेण्ट्री वाटत नाही’ अशी दाद मिळते, तेव्हा आपण गोष्टी सांगण्यात पारंगत होत आहोत याचा आनंद होतो.

गेली २० वर्षं डॉक्युमेण्ट्री दिग्दर्शन आणि निर्मितीत कार्यरत. ७० दिवसांच्या एव्हरेस्ट मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होऊन त्यावर डॉक्युमेण्ट्रीची निर्मिती. ‘किल्ले पाहिलेला माणूस’ हा गोनीदांवरील माहितीपट महोत्सवांमध्ये लोकप्रिय. सह्याद्री वाहिनीवरील ‘तपस्या’ या डॉक्युसीरिजमधील काही भागांचं लेखनदिग्दर्शन.

milindbhanage71@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Documentary is the art of storytelling mrj