एखादं अमूर्त शैलीतलं चित्र बघताना, त्या चित्रातल्या ओळखीच्या रंगांतून अनोळखी अर्थाचा मागोवा घेताना मनात अनेक भावना उमटत जातात. आधी ते समजून घेण्याचा प्रयत्न, मग तोच अर्थ असेल असं कल्पून त्या भोवती कल्पनांचे इमले उभे करणं, त्यात रमणं, आणि शेवटी पुन्हा ‘पण त्या चित्रकाराला नेमकं काय म्हणायचं असेल?’ या शंकेने अस्वस्थ होणे. याच सगळ्या भावनांचे खेळ विलास केळसकर यांचा ‘ढोरवाटा’ हा कथासंग्रह वाचताना अनुभवता येतात.
‘एक होता.’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहानंतर तब्बल बावीस वर्षांनी ‘ढोरवाटा’ हा त्यांचा दुसरा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. ‘अधिष्ठान’,‘अनुष्टुभ’, ‘अक्षर’, ‘स्पंदन’ आदी दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या १५ कथांचा हा संग्रह. शीर्षकावरूनच त्यांचे वेगळेपण लक्षात येते. ‘पेपरवेट खाली पहुडलेला किलवरचा राजा’, ‘माणसाळलेली खार आणि बाबीचं जंगल’, ‘आसुडाच्या गृहितकावर नांगरणी करणारा शेतकरी’ ही त्यातील काही उदाहरणं. शीर्षकावरून मागोवा घेत जावं म्हटले तरी शब्दांच्या मधल्या अर्थाची वाट जाणीवपूर्वक शोधावी लागते.
या कथा म्हटलं तर समाजात असणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्याच, परंतु कथांच्या मांडणीत प्रचंड वैविध्य! पहिल्या कथेचे शीर्षक ‘दोन विदूषक’ असले तरी ती विदूषकांची कथा नाही. यात नाटय़ आहे ते सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचं. रोजच्या जगण्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधताशोधता तो कसा हतबल होतो, त्यातून बुवा-भोंदू कसे निर्माण होतात आणि शेवटी इतरांनी उत्तरं पुरवली तरी स्वतच्या प्रश्नांना त्यांचं त्यांनाच कसे सामोरे जावे लागते, याचे अतिशय हृद्य वर्णन या कथेत आहे.
शालेय अभ्यासक्रमात मुलं जे शिकतात ते त्यांनी अनुभवलेलं असतेच असे नाही. त्यामुळे मुलांच्या मनात कल्पना आणि वास्तव यांच्या पाठशिवणीचा खेळ सतत सुरू असतो. असाच एक संवेदनशील मुलगा त्याच्या पाठय़पुस्तकात लिहिलेले रोजच्या जगण्याशी ताडून बघायला जातो. ‘आई, आंबे, झाडांना लागलेले आंबे, धडा क्रमांक ११’, ‘नांगरलेली जमीन सुवाच्च अक्षरांच्या ओळीसारखी सुरेख’ धडे वाचून तो त्यानुसार मनात चित्र तयार करतो, परंतु वास्तवात मात्र ते तसे नसल्याने त्याच्या मेंदूत असंख्य प्रश्न पडत जातात. याबद्दल लेखक म्हणतो, गावाहून मुंबईला परत येताना तर त्याच्या पुस्तकातले पान अन् पान उलटसुलट होऊन मजकूर नि चित्रं यांची फारच गल्लत त्याच्या डोक्यात चालली होती. पुस्तक नीट क्रमवार लावण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता, पण ते फार कठीण काम होते. ‘आसुडाच्या गृहितकावर नांगरणी करणारा शेतकरी’ ही कथा वास्तव आणि व्यवहार यांचा संबध उलगडून दाखवते.
स्वातंत्र्य सगळ्यांनाच प्रिय असते, परंतु स्त्रीने त्याची मागणी करणे समाजाला तितकेसे रुचत नाही. स्त्रीला कुणाचीतरी सोबत हवीच असे समाजानेच ठरवून टाकलेले असते. एखादी स्त्री आपले एकटेपण, स्वातंत्र्य मनापासून एन्जॉय करत असेल तर तिला ‘तुटक’, ‘माणूसघाणी’ किंवा चक्क ‘विकृत’ अशी विशेषणे बहाल केली जातात. ‘पालीची गोष्ट’ या कथेत अशीच एक एकटी राहणारी आणि त्या एकटेपणात मनपूत रमणारी नायिका आहे. तिचं स्वत:चं विश्व आहे. परंतु लोकांना ते मान्य नाही. कुटुंबातले कोणी ना कोणी येऊन तिने एकटीने राहू नये असा सल्ला तिला देत असतात. तिने तो मानला नाही तर तिच्यावर दोषारोप केले जातात. तिच्या घरात एक पाल पण राहतेय. लेखकाने या पालीच्या हालचालींना एक मानवी चेहेरा दिलाय. नायिकेने तिला ‘सोंटी’ असे नाव सुद्धा ठेवलंय. जणू त्या नायिकेची ती सोबत आहे. त्या दोघींचं एक भावविश्व आहे. एकदा त्या स्त्रीचा भाऊ तिच्याकडे राहायला येतो. तोही एकटाच राहतोय, पण त्याला कुणी दूषणे किंवा सल्ले देत नाही; उलट त्याच्या लग्न न करता एकटे राहण्याला ‘पुरुषार्थ’ म्हणून गौरवले जाते. स्वत: असे जगत असतानाही हा भाऊ बहिणीला एकटी राहू नको असे सल्ले देण्यासाठीच आलाय. घरी आल्यावर तो बाथरूममध्ये जातो, तेव्हा ती पाल त्याला दिसते. बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर असते ही समाजाची भूमिका. त्यात बायका म्हणजे भित्र्या. तो ताबडतोब झाडू घेऊन ती पाल मारून टाकतो. बहीण उघडपणे बोलू शकत नाही कारण ‘पालीला मारू नको’ असे सांगणे म्हणजे लोक सरळसरळ आपल्याला ‘विकृत’ मानतील हा धाक. पण नंतर मात्र ती भावाला तिच्या एकटय़ा राहण्या मागची तिची भूमिका सांगते, ‘मी इतकी र्वष स्वतची मुस्कटदाबी होऊ देत होते. नवरा-मुलं-नातवंडं-समाज या साऱ्यांसाठी. जेव्हा बळ आलं तेव्हा बाहेर पडले-स्वत:च्या नियमांशी प्रामाणिकपणा राखण्यासाठी..’ भावाला तिचा हा विचार पटतो. तो त्याला कितपत कळतो हे माहीत नाही, परंतु तो तिला एकटी राहते म्हणून किमान ‘विकृत’ तरी ठरवत नाही.
या कथेचा शेवट महत्त्वाचा आहे- ‘सोंटीच्या मोबदल्यात मला हेच मिळवायचं होतं नं? आता मी अगदी आनंदित व्हायला हवं तर मग. हात उंचावून भावाला निरोप देताना लक्षात आलं की माझ्या हाताची हालचाल अगदी सोंटीच्या शेपूट हलवण्याच्या हालचालीसारखी होत होती!’
विलास केळसकर यांची भाषा वेगळी आहे. ‘वाळू नि समुद्र उन्हात वाळत पडले होते.’, ‘मीच आहे तो सावकार! स्वतचीच स्वप्नं स्वतकडेच गहाण टाकणारा! स्वतच्याच स्वप्नांच्या टाळूवरचं लोणी विकणारा! माझ्याकडे एक तराजू आहे-वजनं हरवलेला, एक वर्तमान आहे-भूत चिकटलेला.’, ‘कुत्रा भुंकू लागल्यावर काकानं असा काही दम भरला की कुत्र्याचं मांजर होऊन टेबलाखाली गप्प होऊन निजलं.’ या वाक्यांवरून ते ध्यानात येईल. याशिवाय त्यांनी योजलेल्या उपमा रोजच्या व्यवहारातल्या परंतु एरवी ती साम्यस्थळं कुणाच्या लक्षातही येणार नाहीत अशी. उदा. ‘आपली मान कपडा पिळल्यासारखी गरागरा फिरवणारा उंट’, ‘आजूबाजूच्या प्रसन्न शांततेवर मी एकटाच निरीक्षक-जसा सार्वभौम राजा या शांततेचा!’
या कथा आपण सलगपणे वाचू शकत नाही. आधीच्या कथेच्या वाचनाचा मनावर झालेला परिणाम, त्यातून उद्भवलेले प्रश्न, या कथेतल्या व्यक्तिरेखा आपल्यालाही कुठे भेटल्या आहेत का? या गुंत्यातून बाहेर पडल्यानंतरच आपण पुढची कथा वाचायला सुरुवात करू शकतो. ही मधली विश्रांती प्रत्येकाच्या वकुबानुसार बदलेल, पण हा कथासंग्रह वाचकाला विचार करायला भाग पाडेल हे निश्चित. मेंदूला सकस खाद्य देणारा हा कथासंग्रह फुरसतीने वाचायलाच हवा असा आहे.
‘ढोरवाटा’- विलास केळसकर,
मौज प्रकाशन गृह,
पृष्ठे- १४४ , मूल्य-१७० रुपये.
नीलिमा बोरवणकर  borwankar.neelima@gmail.com

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Constitution of India
संविधानभान: संविधानाचे चिरंतन मूल्य