उमरीत अजित पवारांचे प्रतिपादन

प्रसारमाध्यमांवर आम्ही ही योजना काढली, एवढय़ा तरुणांना रोजगार या माध्यमातून दिला. एवढय़ा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, असे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याचे खोटे भासवून, ‘देश बदल रहा है’ असे खोटे ब्रीद वाक्य जनतेसमोर दाखवणाऱ्या पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला महाराष्ट्रातील जनता, ‘महाराष्ट्र बदल गया है’ असे म्हणत येणाऱ्या निवडणुकीत उलथून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उमरी येथे आयोजित हल्लाबोल मोर्चादरम्यान जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. या जाहीरसभेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान सभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुढे, महिला प्रदेशअध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, बसवराज पाटील, संग्राम कोते-पाटील, कमलकिशोर कदम, माजी. खासदार गंगाधरराव कुंटूरकर, माजी आमदार तथा राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी तहसील कार्यालय येथे हलाबोल मोर्चा काढून विविध मागन्यांचे निवेदन देण्यात आले. अजितदादा पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात कपाशीची लागवड केली. परंतु बोंडअळीने कापूस बाधीत झाला. या शासनाने कापसाच्या पंचनाम्याचे आदेश दिले, पंचनामे झाले?, नुकसान भरपाई अजूनही गुलदस्यातच आहे. शेजारील तेलंगना राज्यात शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाते, तर दुसरीकडे त्या राज्याच्या अगोदर अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची वीज तोडली जाते ही मोठी शोकांतिका आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे हे शासन केवळ आश्वासने देऊन आपणास गाजर दाखवत आहे. त्यामुळे या पक्षाची निशानी कमळऐवजी गाजर करावी, असे आवर्जुन सांगितले, त्यामुळे उपस्थित जनसमुदायात एकच हशा पिकला.विरोधी पक्षनेते धनंजय मुढे म्हणाले, देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूर मंदिरात आई भवानी मातेपुढे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, जनसामान्यांच्या खात्यात प्रत्येकी दीड लाख रुपये टाकणार यासारखी पोकळ आश्वासने देऊन, राज्याची तसेच देशाची सत्ता काबीज केली. अशा खोटय़ा बतावण्या करणाऱ्या सरकारला खाली खेचण्याची ताकद फक्त राष्ट्रवादी पक्षात आहे, असे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, हरिहरराव भोसीकर, पं. स.सभापती शिरीष देशमुख आदींची उपस्थिति होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव पुपुलवाड यांनी तर आभार डॉ. विक्रम देशमुख यांनी मानले.