खरिपाच्या ऐन भातकापणी हंगामात परतीचा पाऊस मोठय़ा प्रमाणावर कोसळल्याने वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. तालुक्यात जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील भातपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला गेला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून येथील शेतकरी करोनामुळे पुकारलेल्या टाळेबंदीने नाडलेला आहे. उन्हाळ्यात केलेला भाजीपाला, फुलशेती वाहतूक व बाजारपेठबंदीमुळे विक्री करता न आल्याने मोठय़ा नुकसानीला तोंड द्यावे लागले. या नुकसानीचा सामना करीत असतानाच येथील शेतकऱ्यांचे शेतीबरोबरच जोडव्यवसाय असलेले कुक्कुटपालन, वीटभट्टी या व्यवसायालाही करोनामुळे मोठा फटका बसला.

करोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाल्याने कुठेही रोजगार मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी करोनाची भीती न बाळगता आपल्या पारंपरिक शेतीमध्ये स्वत:ला झोकून देऊन खरीप हंगामात भातपिकाची लागवड केली. पावसाची चांगली साथ मिळाल्याने भातपीकही सोन्यावानी पिकून आले. पिकलेल्या भाताची कापणी सुरू झाली आणि परतीच्या पावसाचे आगमन सुरू झाले.

सोसाटय़ाचा वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने येथील शेतकऱ्यांना उद्ध्वस्तच करून टाकले. वाडा तालुक्यात जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील भातपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज येथील कृषी विभागाकडून वर्तविला गेला आहे. वादळी वाऱ्याने जमीनदोस्त केलेल्या भाताची कापणी करणे, ते पाण्यातून बाहेर काढून सुकवणे यासाठी येणारा मजुरी खर्च हा मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याने हा खर्च कसा करायचा हा भीषण प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

गुरांचा चाराही गेला

परतीच्या पावसामुळे भाताच्या पिकासोबत पेंढय़ांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याने उन्हाळ्यात गुरांना चारा काय द्यायचा, हा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पेंढा कुजून काळा पडल्याने हा पेंढा व्यापारी खरेदी करीत नाहीत व गुरेही खाणार नाहीत. पेंढा विक्रीतून मिळणारे उत्पन्नही शेतकऱ्यांचे या पावसाने हिरावून घेतले आहे.

या अस्मानी संकटात शासनाने आम्हा आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. लवकर पंचनामे व्हावेत.

– दयाराम पाटील, शेतकरी प्रतिनिधी, पिक, ता. वाडा.

पंचनामे सुरू असून लवकरच नुकसानीचे अहवाल वरिष्ठांना सादर केले जातील

– माधव हासे, तालुका कृषी अधिकारी, वाडा.