उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शेतीचा ताबा घेऊन तो अधिकृत मालकाला देण्याची कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पोलिस दलाच्या ताफ्यासमोरच शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी येथून १५ किलोमिटर अंतरावरील लोणी घाटाणा शिवारात घडली. या घटनेने महसूल प्रशासनाला थांबवावी लागली.
तहसीलदार अनूप खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिलिंगमध्ये मिळालेल्या ५ एकर जमिनीची मालकी आदिवासी शेतकरी श्यामराव गेडाम यांची होती. मात्र, शेतीचा ताबा बाबुलाल छोटेलाल राठोड यांच्याकडे होता. त्यामुळे बाबुलालकडून ताबा काढून ती शेतजमीन आपल्याला मिळावी, यासाठी श्यामराव आणि बाबुलाल यांच्यात १९९२ पासून कोर्टकचेऱ्या सुरू होत्या. बाबुलालच्या मते मधुकर येरावार यांच्याकडून त्यांनी शेत विकत घेतले होते, तर श्यामलालच्या मते ही जमीन त्याला सििलगमध्ये सरकारकडून मिळाली होती. मधुकर येरावार यांचे निधन झाल्याने हे प्रकरण २० वर्षांपासून न्यायालयात चालू होते. अखेर, मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय नागपूर खंडपीठाने जानेवारी २०१५ मध्ये निकाल देऊन बाबुलाल राठोडचा ताबा काढून तो श्यामराव गेडाम या शेतमालकास देण्याचे आदेश महसूल विभागाला दिले. या विभागाने ५ महिने मुदत देऊनही बाबुलालने ताबा सोडला नाही म्हणून तो घेण्यासाठी श्यामराव गेडाम आणि तहसीलदार अनूप खाडे, गटनिरीक्षक पी.एल.राणे यांच्यासह या विभागाचा ताफा पोलीस संरक्षणात शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घटनास्थळी गेला तेव्हा बाबुलालने शेतीचा ताबा देण्यास स्पष्ट नकार देऊन अधिकाऱ्यांच्या या ताफ्यासमोरच विष प्राशन केले. या घटनेने अवाक् झालेल्या अधिकाऱ्यांनी कारवाई थांबवून बाबुलालला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तो मरण पावला.
तहसीलदारांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसते तर न्यायालयाच्या अवमानाच्या कारवाईला आम्हालाच सामोरे जावे लागले असते. बाबुलालच्या आत्महत्येचे हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून पुढील कारवाई न्यायालयाचा जो आदेश राहील त्याप्रमाणे केली जाईल. दरम्यान, बाबुलालच्या पाíथवावर शवविच्छेदनानंतर त्याच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहेत. वडगाव पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 5:39 am