दलित समाजातील नितीन साठे या युवकाचा कोतवाली पोलीस ठाण्यात मारहाण करून त्याचा खून केल्याच्या आरोपातील चौघे पोलीस कर्मचारी आज, गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर राज्य गुन्हे अन्वषेण विभागाच्या (सीआयडी) अधिका-यांनी या चौघांना अटक केली. चौघांनाही दि. १३ पर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने सायंकाळी दिला.
हवालदार सादिक सैफुद्दीन शेख, हेमंत जबाजी खंडागळे, पोलीस नाईक संजय सूर्यभान डाळिमकर व पोलीस शिपाई संदीप मधुकर शिंदे अशी चौघांची नावे आहेत. या चौघांशिवाय कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले व उपनिरीक्षक विश्वनाथ निमसे हे दोघेही या प्रकरणात आरोपी आहेत, मात्र ते अजून फरार आहेत. ढोकले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळला आहे.
हे चौघे सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाल्यावर सुरुवातीला कोतवाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास नकार दिला होता, मात्र प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित झाल्यावर ताब्यात घेतले व सीआयडीकडे सुपूर्द केले. चौघांना न्यायालयात हजर केल्यानंतर मृत्यूच्या घटनेची न्यायालयीन चौकशी केलेल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांच्या पुढेच हे प्रकरण सुनावणीला आले होते. परंतु त्यांनी सुनावणीस नकार दिल्याने अन्य प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांच्या पुढे त्याची सुनावणी झाली. सरकारतर्फे सरकारी वकील के. एम. कोठुळे व तपासी अधिकारी तथा सीआयडीचे उपअधीक्षक सुभाष निकम यांनी युक्तिवाद करताना अद्यापि तपास बाकी आहे. अन्य दोन फरारी आरोपींचा शोध घ्यायचा आहे. खुनाचा उद्देश स्पष्ट व्हायचा आहे. मारहाण केलेले साहित्य जप्त करायचे आहे, त्यासाठी कोठडी देण्याची विनंती केली, तर आरोपींचे वकील संदीप डापसे यांनी सर्व साहित्य जप्त झालेले आहे. घटनास्थळाची पाहणी व पंचनामा झाला आहे. आरोपी नितीन साठे हा पहिल्यापासूनच पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यातूनच तो बेडीसह पळून जाताना जखमी झाला. त्यामुळे कोठडीची आवश्यकता नाही, याकडे लक्ष वेधले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर चौघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
कोतवाली पोलिसांनी नितीन ऊर्फ बाळू भाऊ साठे (वय २८ रा. जवळे, पारनेर) याला दि. २७ मे रोजी ताब्यात घेतले, मात्र त्याला अटक न दाखवता बेकायदा ताब्यात ठेवले होते. पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच दिवशी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. सीआयडीने चौकशी करून दि. १३ जुलैला दोन अधिकारी व चार पोलीस कर्मचारी अशा सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.