पश्चिम किनारपट्टी, कोकणात दाखल झालेल्या ‘निसर्ग’ वादळाची झळ यवतमाळातही बसली. आज (बुधवार) दुपारी जिल्ह्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळला. यवतमाळ शहरात दुपारी दीड वाजताच्या सुमारास धुवाधार पाऊस झाल्याने उन्हामुळे वाढलेला पारा अचानक खाली आला.

सोमवारी १ जून रोजी सायंकाळी यवतमाळसह काही भागात पाऊस झाला होता. त्यानंतर आज बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ७ वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरूवात झाली. काही वेळ मुसळधार कोसळल्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाची संततधार जिल्ह्यात अनेक भागात सुरू होती.

या पावसाने शेतकरी सुखावला असून कृषी केंद्रांवर बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंत १५.७ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.