‘लॅनसेट’ या जगविख्यात मासिकाच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे सव्वा ते दीड लाख आत्महत्या होतात. जगातील अन्य देशांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. या आकडेवारीपकी ६० ते ७० हजार आत्महत्या करणारे ४० वयोगटाखालील आहेत. एखाद्या गुन्ह्यात अथवा युद्धामध्ये आढळून येणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा अधिक चिंताजनक आहे. त्यामुळे संवेदनशील व्यक्तींनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गारपीटग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भावनिक आधार देण्यासाठी मानसमित्र अभियान राबविले जात आहे. या उपक्रमांतर्गत उस्मानाबाद येथे मानसमित्र प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष किरण सगर, उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे, सचिव बालाजी तांबे यांच्यासह विविध समविचारी संस्था, संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
डॉ. दाभोलकर म्हणाले की, आत्महत्या करणाऱ्या १०० व्यक्तींपकी ९० व्यक्ती त्यांच्या दैनंदिन व्यवहारातून ते काहीतरी वेगळे वर्तन करीत असल्याची लक्षणे दाखवितात. ही ती लक्षणे ओळखून मानसमित्रांनी योग्यवेळी भावनिक आधार देणे गरजेचे आहे. आत्महत्या करण्याचा विचार ज्याच्या मनामध्ये निर्माण होतो, अशा व्यक्तीला आधार देणे, त्यामध्ये आशा निर्माण करणे, कुटुंबाचा सहभाग वाढविणे आणि शेवटी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
व्यवस्था, शासन यांनी आपल्याला नागवले आहे, कुटुंबीयांनाही आपल्या दु:खात रस नाही. अशा उद्वीग्न अवस्थेत व्यक्ती आत्महत्येकडे वळतो. अशावेळी त्याच्या मनाला मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे आत्महत्या घडते. ही टोकाची स्वार्थी कृती आहे. आत्महत्या म्हणजे शेवटचा पर्याय नाही. अशा व्यक्तींना समजावून सांगणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतीच्या जटील प्रश्नातून आत्महत्या घडत आहेत. त्या समस्या सोडविण्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समिती करीत नाही, परंतु अशा जटील काळात लढण्याचे बळ, भावनिक आधार देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका या अभियानाच्या माध्यमातून साध्य करणे आणि अविवेकी वर्तन रोखण्यासाठी मानसमित्रांची नवीन फळी निर्माण करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.