News Flash

‘शाळा बंद, शिक्षण सुरू’; चंद्रपूर जिल्ह्याचा ‘मिशन मॅथमॅटिक्स’ सर्जनशील उपक्रम

राज्यात अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच राबविला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे जगात अनेक समस्या निर्माण झाल्या असून सर्वच आस्थापना बंद पडल्या आहेत. त्यातून शाळाही सुटल्या नाही. शाळा बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या ब्रीदवाक्यानुसार गावागावांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जिज्ञासा निर्माण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून ‘मिशन मॅथमॅटिक्स’ हा सर्जनशील उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात अशा प्रकारचा  उपक्रम प्रथमच राबविला जात असल्याचेही सांगितले जात आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांची ही मुळ संकल्पना आहे. मनुष्य हा पंचज्ञानेंद्रियामार्फत ज्ञान आत्मसात करत असतो. त्यापैकी डोळा या ज्ञानेंद्रियामार्फत ८३ टक्के ज्ञान संपादित करतो. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चालता- बोलता, खेळतांना आनंददायी शिक्षणाचे धडे मिळावे या उद्देशाने ‘मिशन मॅथमॅटिक्स’ या संकल्पनेला सुरूवात करण्यात आली आहे. गावागावांमध्ये मुख्य चौरस्त्याच्या भिंतीवर पेंटिंगमध्ये ‘मिशन मॅथमॅटिक्स’ च्या संकल्पना रेखाटण्यात आल्या आहेत. यामुळे गावात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाली आहे. विद्यार्थी खेळताना मित्राच्या व पालक वर्गाच्या सहकार्याने शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत.

सर्वप्रथम पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील विद्यार्थी अक्षय वाकुडकर या युवकाने गावात ‘मिशन मॅथमॅटिक्स’ उपक्रमाला सुरूवात केली. या उपक्रमाचा शैक्षणिक दृष्टीकोनातून त्या गावातील विद्यार्थ्यांचा फायदा होवू लागला. त्यामुळे सदर उपक्रमाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत पोंभुर्णा, बल्लारपूर, नागभीड, ब्रम्हपुरी या तालुक्यातील गावांमध्ये या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमात गणितीय संकल्पना, भूमितीय संकल्पना, विज्ञान संकल्पना इत्यादींचा समावेश आहे.

ज्या गावात ऑनलाईन शिक्षण पोहोचू शकत नाही, त्या गावातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे. भिंतीवर रेखाटलेले गणित आकर्षक असल्यामुळे विद्यार्थी त्याकडे आकर्षित होवून त्यात रममान होत आहेत. त्यामुळे मुलांमधील गणिताची भीती कमी होण्यास मदत होत आहे. मुलांची निरीक्षण क्षमता वाढविणे शक्य होत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 8:40 am

Web Title: school closed education resumed mission mathematics creative initiative of chandrapur district msr 87
Next Stories
1 हिंगोलीतील बनावट नोटा प्रकरणाचे पांढरकवडा कनेक्शन उघड
2 टाळेबंदीमुळे नोकरीवर गदा, रोजगाराच्या शोधासाठी वाहतुकीचा अभाव!
3 एसटीत दाटीवाटी
Just Now!
X