खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यू मूनचा तिहेरी योग

येत्या बुधवारी (३१ जानेवारी) खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा खास नजराणा आकाशात पाहायला मिळणार आहे.  रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात या तिहेरी योगाचे दर्शन होणार असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या आधी १५२ वर्षांपूर्वी म्हणजेच ३१ मार्च १८६६ रोजी असा तिहेरी योग जुळून आला असल्याचेही ते म्हणाले.

ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात. त्या दिवशी चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ५९ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे.

एका इंग्रजी महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ असे म्हटले जाते. ‘ब्ल्यू मून’ म्हटले जात असले तरी त्या दिवशी चंद्र निळ्या रंगाचा दिसत नाही. यंदा २ आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ म्हटले आहे. बुधवार, ३१ जानेवारी याच दिवशी खग्रास चंद्रग्रहणही असून ते भारतातून खग्रास स्थितीत दिसणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.

३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितीजाच्या खाली असल्याने दिसणार नाही. सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होणार असून साध्या डोळ्यांनी सुपरब्ल्यू-ब्लडमूनचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने पौर्णिमा असूनही चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगाचे दिसते. म्हणून त्याला ‘ब्लड मून’ म्हटले जाते. ग्रहणमध्य सायंकाळी सात वाजता आहे. त्यावेळी चंद्रबिंब पूर्व आकाशात बरेच वरती आलेले असेल. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण सुटून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर येईल, अशी माहितीही सोमण यांनी दिली.

या नंतर २६ मे २०२१ रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण आणि ३१ डिसेंबर २०२८ रोजी ब्ल्यूमून आणि चंद्रग्रहण असा योग येणार आहे. तर ३१ जानेवारी २०३७ रोजी पुन्हा तिहेरी योग आहे. तेव्हा सुपर-ब्ल्यू-ब्लड मूनचे दर्शन होणार आहे.