प्रशांत देशमुख

पंतप्रधानांना पत्र लिहिल्याबद्दल विद्यार्थ्यांना निलंबित केल्याप्रकरणी सर्वत्र गदारोळ झाल्यानंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने सहाही विद्यार्थ्यांचे निलंबन रविवारी मागे घेतले.

रजेवरून परतलेले विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी तातडीची बैठक घेत हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचे भविष्य व विद्यापीठातील वातावरण कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. चुका झाल्यास विद्यार्थ्यांना दंड करतो. परंतु त्यांना सुधारण्याची संधीही देतो. याबाबत नेमके काय घडले याचा शोध घेणे, विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेणे व घटनेशी संबंधितांची ओळख पटवण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

देशातील विद्यमान स्थिती व काश्मीर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑक्टोबरला विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना सामूहिक पत्र लिहिण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यापूर्वी कांशिराम यांची जयंती साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परवानगी मागितली होती. मात्र प्रशासनाने नकार दिला. त्याच दिवशी विद्यार्थी पत्रलेखन करत असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. या वेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

कार्यकारी कुलसचिव डॉ. राजेश्वर सिंह यांनी मध्यरात्री सहा विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आल्याची नोटीस संकेतस्थळावर टाकली. विद्यार्थ्यांवर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला. मात्र ही बाब विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे सांगत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी विद्यापीठ प्रशासनास विद्यापीठाच्या कायद्यानुसार कारवाई करण्याचे सुचवले.

दरम्यान, काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन विद्यापीठ प्रशासनावरच कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाने विद्यापीठास नको ती प्रसिद्धी मिळत असल्याचे पाहून कुलगुरू रजनीशकुमार यांनी रजा अर्धवट टाकून बैठक घेत निलंबन रद्द केले.