राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली असून राज्यात काही भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. सोलापूरात काही मतदान केंद्रांमध्ये पाणी शिरल्याची माहिती असतानाच आता पुण्यात मतदारांना मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान करण्याची वेळ आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील विद्याभवन शाळेत रात्रीपासून वीज नसल्याने मेणबत्ती लावून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली असून राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागतेय. राज्याच्या इतर भागांमध्ये निवडणुक आयोगाने निवडणूक यंत्रणांनी योग्य ती पुर्वतयारी झाली असल्याचं सांगितल होतं. पण शिवाजीनगर येथील विद्याभवन शाळेत रात्रीपासून वीज नसल्याने मेणबत्ती लावून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्याची वेळ आली. याशिवाय, सोलापूरमध्ये रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे काही मतदान केंद्रात व काही मतदान केंद्राबाहेर पाणी साचल्याचं चित्र आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यात सकाळी 9 वाजेपर्यंत हडपसरमध्ये सर्वाधिक 8 टक्के तर सर्वात कमी कॅन्टोन्मेंट मध्ये 3.15 टक्के मतदान झाले आहे. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत पिंपरी 4.01 टक्के, चिंचवड – 6.10 टक्के तर भोसरी – 5.11 टक्के अशी मतदानाची आकडेवारी आहे.