मागील पंधरा दिवसांपासून पट्टेदार वाघांने सिंदेवाही, लोनवाही परिसरात दहशत माजवली आहे. आज मंगळवारी सकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाने सिंदेवाही पाथरी मार्गावरील सहकारी राईस मिलमध्ये शिरकाव करून एका व्यक्तीला जखमी केल्याची घटना समोर आली.

सिंदेवाही सहकारी राईस मिलमध्ये पट्टेदार वाघाने गावठी डुक्कराची शिकार केली. वाघ शिकारीवर झाडाझुडपात लपून ताव मारत असताना राईस मिलचा कर्मचारी गजानन मुरलीधर ठाकरे (वय ४०) हा राईस मिल मागे कोंडा आणण्यासाठी गेला. यावेळी वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले. यावेळी दुसऱ्या एका व्यक्तीने आरडाओरडा केल्याने तो व्यक्ती वाघाच्या तावडीतून बचावला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

गेल्या तीन वर्षापासून सिंदेवाही पाथरी रोडवर मटण मार्केट सुरू झाल्याने या परिसरात वाघ बिबट्याचा शिरकाव होत असतो. दोन वर्षांपूर्वी या परिसरात मटण मार्केट परिसरात धुमाकूळ घातला होता. लोनवाही परिसरात मोठय़ा प्रमाणात शासकीय कार्यालये असून त्याच्या मागे जंगल वाढलेले आहे. तसेच हा परिसर जंगलाला लागून असून नेहमी हिंस्रप्राणी मटण मार्केटच्या आसपास रात्रीच्या अंधारात येऊन मटणाचे अवशेष खाण्यासाठी येतात. वाघ बिबट्याला आयते खाद्य मिळत असल्याने ते या परिसरात रात्री फिरत असतात तसेच या परिसरात मोठय़ा प्रमाणावर गावठी डुक्करांचा वावर असतो.

सिंदेवाही लोनवाही परिसरातील रोडवर असलेल्या मटण मार्केटमुळेच हिंसक प्राणी येथे येत असल्याने या परिसरातून मटण मार्केट हटवण्याची मागणी या परीसरातील नागरिकांकडून होत आहे.