शेतकऱ्यांना देण्यात येणारी अडीच ते तीन कोटी रुपयांची नुकसानभरपाई परस्पर लाटल्याप्रकरणी सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गाचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले आहे. या महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप नियमानुसार नुकसानभरपाई मिळालेली नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच नुकसानभरपाईपोटी आलेले धनादेश परस्पर वटवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक उदय जोशी यांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हेमंत सोनावणे, दिवाकर पाटील, नितीन वाघ, शंकर रेड्डी आणि मोहन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही संशयित आरोपी फरार आहेत.