राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (शरद पवार गटाला) निवडणूक आयोगाने ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. शरद पवार गटाने आज (२४ फेब्रुवारी) किल्ले रायगड येथे या ऐतिहासिक चिन्हाचं अनावरण केलं. यानिमित्त रायगडावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. तुतारी हे चिन्ह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, या निवडणूक चिन्हावरून राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शरद पवार गट समाजमाध्यमांवर एकमेकांना चिमटे काढत आहे.

निवडणूक चिन्हाचं अनावरण केल्यानंतर शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून जल्लोष केला. दरम्यान, अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांचा तुतारी वाजवतानाचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. आव्हाड यांचा तुतारी वाजवण्याचा प्रयत्न बरा असला तरी अमोल मिटकरी यांनी त्यावरून आव्हाडांना चिमटा काढला आहे. मिटकरी यांनी हा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत म्हटलं आहे की, “ही तुतारी आहे की पुंगी? आमच्याकडे उन्हाळ्यात कुल्फी विकणारे असंच वाजवतात.” यासह ‘कुल्फीवाले’ असा हॅशटॅगही मिटकरी यांनी दिला आहे. त्याचबरोबर ‘आली बेकारी, वाजवा तुतारी’ असं लिहून मिटकरी यांनी अवाहाडांना चिमटा काढला आहे.

दरम्यान, निवडणूक चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी तब्बल ४० वर्षांनंतर शरद पवार रायगड किल्ल्यावर गेले होते. या कार्यक्रमानंतर भाजपा आणि अजित पवार गटाने शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले, “कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हाचे लोकार्पण रायगडावर होणे, चुकीची बाब आहे. या सोहळ्यावर शरद पवार गटातील सर्वच नेते समाधानी असतील तर आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे हे त्या ठिकाणी अनुपस्थित का राहिले? याचा अर्थ तुतारीचा निर्णय इतर लोकांना पटलेला दिसत नाही. रायगडाच्या मातीत अशाप्रकारे राजकीय कार्यक्रम होणं अत्यंत चुकीचं आहे.”

हे ही वाचा >> “बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत होणार?” संजय काकडेंचं वक्तव्य; मतांचं गणित मांडत सांगितलं कोण जिंकणार?

राजेश टोपे सहा आमदारांना घेऊन अजित पवार गटात येणार?

मिटकरी यांनी म्हटलं आहे की, “आज सकाळी कालवा समितीची पुण्यात बैठक झाली. अजित पवारांच्या नावाने रोज नाकाने कांदा सोलणारे बालमित्र मंडळाचे अध्यक्षही (रोहित पवार) तिथे होते. आमच्या पक्षाचे काही आमदारही तिथे होते. हे सर्व आमदार पश्चिम महाराष्ट्रातील असून कालव्याशी संबंधित होते. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी अजित पवारांची भेट घेतली. ही भेट गुप्त होती. हा फक्त ट्रेलर असून पिक्चर मार्च महिन्यात बघायला मिळेल. लवकरच मोठा विध्वंस होणार असून राजेश टोपे यांच्यासह सहा आमदार अजित पवार गटात येतील.” एबीपी माझाशी बोलताना मिटकरी यांनी हा दावा केला आहे.