मुंबई-गोवा महामार्गावर अपघात हे नित्याचेच झाले आहेत. पुढील महिन्यात गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची रीघ लागणार. श्रावण-भाद्रपदात कोकणात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण चालू असते.  एखाद्या वळणावर हा निसर्ग चकवा देत मृत्यू म्हणूनही उभा ठाकू शकतो. मात्र योग्य ती काळजी घेतल्यास हे अपघात टाळणे शक्य आहे.
गणेशोत्सवाला अजून सुमारे एक महिन्याचा अवधी असला तरी कोकणातील चाकरमान्यांना यापूर्वीच त्याचे वेध लागले आहेत. कोकणात येणाऱ्या रेल्वे गाडय़ा केव्हाच ‘फुल’ झाल्या असून दरवर्षीप्रमाणे जादा गाडय़ा आणि खासगी वाहनांनी मोठय़ा संख्येने चाकरमानी कोकणात येतील, असा अंदाज आहे. रेल्वे आणि एसटी महामंडळाने कितीही प्रयत्न केले तरी या काळात कोकणात येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत ते अपुरेच पडतात, असा अनुभव आहे. त्यामुळे खासगी आरामगाडय़ा किंवा भाडोत्री गाडय़ांचा आधार घेतला जातो. शिवाय स्वत:च्या चारचाकी गाडय़ांमधून येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या लक्षणीय असते. विशेषत:, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर या वाहनांची इतकी गर्दी होते की, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यातून वाट काढत, लवकरात लवकर आपल्या गावी पोचण्यासाठी गाडय़ा दामटल्या जातात. प्रसंगी चुकीच्या पद्धतीने पुढील वाहनांना ओलांडून जाण्याचे प्रयत्न होतात आणि इथेच अपघाताला निमंत्रण मिळतं. दरवर्षी या महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये शंभराहून जास्त प्रवासी जीव गमावतात. त्यापैकी बहुसंख्य घटना गणेशोत्सव, दिवाळी, शिमगा किंवा उन्हाळी सुट्टीत घडतात, असं या अपघातांची आकडेवारी दाखवते.
विघ्नहर्त्यांचा उत्सव साजरा करायला जात असतानाच असं विघ्न येण्याचं मुख्य कारण असतं, या खासगी वाहनांचे चालक. कारण, कोकणात, विशेषत: रत्नागिरी जिल्ह्य़ातून जाणाऱ्या या महामार्गावर काही ठिकाणी सरळ रस्त्याला अचानक वळणं आहेत. तसंच काही ठिकाणी तीव्र उताराची अवघड वळणं आहेत. अशा ठिकाणी हे चालक कितीही अनुभवी असले तरी त्यांना या वळणांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वेगात धावत असलेल्या गाडीवर अचानक नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात हमखास अपघात घडतात. सणाच्या काळात चालकांसाठी मागणी वाढत असल्याने अनेकदा अननुभवी चालक घेतले जातात किंवा या काळातील मागणीच्या ताणामुळे त्यांना पुरेशी विश्रांती मिळालेली नसते. त्यामुळेही थकव्याने डोळ्यावर झापड येऊन अपघात घडतात. चारचाकी लहान गाडय़ा किंवा खासगी आरामगाडय़ा, या दोन्ही प्रकारच्या वाहनांबाबत हे अनुभवाला येतं. त्याचबरोबर कौटुंबिक सहलीला निघालेल्या गाडय़ा अनेकदा त्या कुटुंबातील सदस्यच चालवतात. शहरी वाहतुकीचा मर्यादित अनुभव असलेले हे चालक या महामार्गावर गाडय़ा चालवतात तेव्हा अशा अपघातांची शक्यता आणखी वाढते. त्यातून संपूर्ण कुटुंब अपघातात सापडण्याचेही प्रकार घडतात.
कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांमधून हा महामार्ग जातो. त्यापैकी रायगड जिल्ह्य़ात महामार्गावरील अपघातात २०१३ मध्ये १२२ प्रवासी मृत्युमुखी पडले. गेल्या वर्षी ही संख्या ९३ होती, तर यंदा पहिल्या तिमाहीत २८ जणांचा बळी गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात २०१३ मध्ये १३० आणि गेल्या वर्षी ११० जण महामार्गावरील अपघातात मरण पावले, तर यंदा जानेवारी ते जुलै या कालावधीत ३९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातही साधारणत: हेच चित्र आहे. याव्यतिरिक्त अशा अपघातांमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांची संख्या शेकडय़ांमध्ये आणि  किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या तर काही हजार आहे. सुदैवाने या जिल्ह्य़ामधील पोलीस यंत्रणेने गेल्या काही वर्षांपासून अपघात झाल्यावर घटनास्थळी धाव घेण्यापेक्षा अपघात होऊच नयेत, यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्य़ात खेड तालुक्यातील कशेडी घाटापासून राजापूपर्यंत ३४ अपघातप्रवण ठिकाणं पोलिसांनी निश्चित केली असून ४५ ठिकाणी फायबरची बॅरिकेड लावली जातात. त्याचबरोबर जिल्ह्य़ाच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर १७ तात्पुरत्या चौक्या उभारून वाहतुकीवर रात्रंदिवस देखरेख केली जाते. काही ठिकाणी तर स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने खासगी प्रवासी गाडय़ा आणि छोटी वाहनं थांबवून प्रवाशांना, विशेषत: या गाडय़ांच्या चालकांना चहा-पाणीही केलं जातं. त्यामागचा उद्देश स्पष्ट आहे आणि त्याचे अपेक्षित परिणामही दिसू लागले आहेत. अपघातांचं प्रमाण रात्रीच्या काळात जास्त असतं आणि तरीही अनेक जण रजेची बचत करण्यासाठी दिवसभर नोकरी करून रात्रीचाच प्रवास पसंत करतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. हा बचतीचा मोह टाळल्यास अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकेल, असं मत रत्नागिरी विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर एकूण अपघातांपैकी सुमारे ७० टक्के अपघात चुकीच्या ओव्हरटेकिंगमुळे होतात, असं निरीक्षण नोंदवून वाहनचालकांनी त्यावर नियंत्रण ठेवावं, असं आवाहन त्यांनी केलं. गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात महामार्गावरील खारेपाटण ते बांदा-पत्रादेवीपर्यंत १५ तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारल्या जाणार असून पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे ८० जणांचा ताफा अपघात टाळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.  अर्थात अशा प्रकारे महामार्ग पोलीस किंवा जिल्हा पोलीस दलं अपघात टाळण्यासाठी आपल्या परीने निरनिराळे उपाय करत असली तरी या वाहनांनी प्रवास करणारे चाकरमानी आणि वाहनांच्या मालक-चालकांनी त्याबाबत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. श्रावण-भाद्रपदात कोकणात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण चालू असते, पण एखाद्या वळणावर हा निसर्ग चकवा देत मृत्यू म्हणूनही उभा ठाकू शकतो व ‘कोकणची वाट अन् जिवाशी गाठ?’ असे म्हणण्याची वेळ येऊ शकते.
अपघातमुक्त उत्सव साजरा करू या – डॉ. संजय शिंदे
कोकणातील यंदाच्या गणेशोत्सवात महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, जिल्ह्य़ातील पोलीस पाटील आणि रस्ता सुरक्षा दलाचेही सहकार्य घेण्याची योजना आखली आहे. ते म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्य़ातून जाणाऱ्या महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात होणारी वाहतूक लक्षात घेता पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच अन्य संस्थांना सहभागी करून घेण्याची ही योजना आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे जास्त सोपे जाईल आणि पर्यायाने संभाव्य अपघातही टळतील.या संदर्भात राष्ट्रीय सेवा योजनेचे मुंबई विद्यापीठातील समन्वयक, तसेच रस्ता सुरक्षा दलाच्या महासमादेशकांशी चर्चा झाली असून त्यांनी सहभागाचे आश्वासन दिले आहे. यामध्ये पोलीस पाटलांना दिवस व रात्रीच्या पाळ्या देऊन जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना यातून वेगळ्या प्रकारचा कार्यानुभव मिळणार आहे. तसेच त्यांना पोलीस दलातर्फे सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.अशा प्रकारे समाजातील विविध संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम केल्यास यंदाचा गणेशोत्सव अपघातमुक्त राहील, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

 

Nashik, Trimbak, Ooty Vari,
नाशिक : त्र्यंबकमध्ये उटीची वारी सोहळा उत्साहात
Divorce propaganda songs Kawan no New Indian Pop Stars This book
द्वेषाचे सुरेल दूत..
Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
Nagpur, Gold Prices Drop, Continuous Increase, gold price drop in nagpur, nagpur gold price, today gold price, gold price decrease, gold in nagpur, nagpur news, gold news, marathi news,
खूशखबर…. सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीचे दरही ३ हजारांनी घसरले