शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण कमी करायचे असल्यास पंतप्रधानांनीच जाहीर केलेल्या कापसाच्या हमीभावाची अंमलबजावणी करून कापसाला ९ हजार, ७५५ रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी केली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे २० मार्च २०१४ ला आयोजित केलेल्या ‘ चाय पे चर्चा ’ कार्यक्रमात शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव दिल्या जाईल, अशी घोषणा केली होती. मोदी आता पंतप्रधान आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याची वेळ आली आहे. कापसाचा उत्पादन खर्च राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील कुलगुरू आणि तज्ज्ञांच्या समावेश असलेल्या महाराष्ट्र कृषी मूल्य व उत्पादन खर्च आयोगाने निश्चित केला असून ६ हजार ५५५ रुपये उत्पादन खर्च येतो, असे म्हटले आहे. त्याप्रमाणे कापसाला ९ हजार ७५५ रुपये प्रती क्विंटल हमी भाव असला पाहिजे, असे अ‍ॅड. वाटप यांनी म्हटले आहे.
विदर्भात यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्य़ांत मोठय़ा प्रमाणात कापसाची लागवड होते. यवतमाळ जिल्ह्य़ात लागवड योग्य क्षेत्र दहा लाख हेक्टर असून कापसाचा पेरा ४ लाख ७८ हजार हेक्टरवर झाला आहे. त्यातील जवळपास २५ हजार हेक्टरवरील कापसाचे पीक सुरुवातीलाच नष्ट झाले आहे. उर्वरित कापसाची स्थिती शेवटच्या पावसाअभावी अतिशय वाईट असून उत्पादनात प्रचंड घट होणार आहे. शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आता पंतप्रधानांनीच घोषित केल्याप्रमाणे हमीभाव दिला नाही तर आत्महत्यांचे प्रमाण वाढल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. अमरावती विभागात कापूस आणि सोयाबीन ही दोनच मुख्य नगदी पिके असून सोयाबीन पार बुडाले आहे. पावसाअभावी सोयाबीनच्या पाच दाणी शेंगामध्ये दोनच दाणे भरले असून ते देखील मुगाच्या आकारापेक्षाही कमी आकाराचे आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरता बुडाला आहे. कापसाची तीच स्थिथी झाली आहे. कापसावर आलेल्या रोगांमुळे पात्या, फुले आणि बोंड गळून पडत आहेत. शेतकऱ्यांची विदारक अवस्था दूर करण्यासाठी कापूस पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्रे उघडून ९ हजार ७५५ रुपये प्रति क्विंटल हमी भावाने कापूस खरेदी सुरु करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

हा कसला ‘जाणता राजा’
स्वतला शेतकरी म्हणवत जाणता राजा चे बिरुद मिरवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर अ‍ॅड. वामनराव चटप यांनी जोरदार टीका केली आहे. कापसाचा उत्पादन खर्च मोदी सरकारने किती रुपये काढला आहे आणि कसा काढला आहे याची विचारणा आपण खुद्द पंतप्रधानांना भेटून करणार आहोत त्यानंतरच हमीभावाची मागणी करू, असे उत्तर शरद पवार यांनी विदर्भ दैऱ्यात यवतमाळात वार्ताहरांच्या एका प्रश्नाला दिले होते, हा संदर्भ देत चटप म्हणाले की, ज्यांना उत्पादन खर्च कसा काढतात हे माहीत नाही, ते केंद्रात कृषी मंत्री होते, हे दुर्दैव असून हा कसला ‘जाणता राजा’ असा उपरोधिक टोला त्यांनी पवारांना लगावला आहे.

बी.टी. कॉटनचा भंडाफोड
विदर्भात ९९ टक्के कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बी.टी. कापसाला प्राधान्य दिले आहे. बी.टी. कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नाही असा कंठशोष बियाणे उत्पादक कंपन्या करून सांगत आहेत. मात्र, यंदा बोंड अळीचा प्रादुर्भाव बी.टी. कपाशीवर होऊन कापसाची बोंडे गळून पडत असल्याची माहिती पऱ्हाटीची झाडे वार्ताहरांना दाखवून जि.प. सदस्य देवानंद पवार यांनी बी.टी. कॉटनचा भंडाभोड केला आहे. कापसाचे उत्पादन यंदा मोठय़ा प्रमाणात घटणार असून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमी भाव शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी पवार यांनी केली आहे.